ऑनलाईन टीम / मुंबई :
पालघर जवळील नंडोरे आदिवासी विकास प्रकल्पाच्या आश्रमशाळेतील 30 विद्यार्थी आणि एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाली असल्याची माहिती मिळाली आहे. दरम्यान, विद्यार्थ्यांसह एका शिक्षकाला कोरोनाची लागण झाल्यानंतर प्रशासनाने आश्रमशाळा सील केली आहे.
मिळालेल्या अधिक माहितीनुसार, नंडोरे आश्रमशाळेत नववी ते बारावीचे वर्ग सुरु होते. काही विद्यार्थिनींना लक्षणे आढळून आल्यानंतर सुरुवातीला नऊ विद्यार्थींना कोरोनाची लागण झाली असल्याचे तपासणीतून निष्पन्न झाले. त्यानंतर सर्वच्या सर्व 193 विद्यार्थ्यांची तपासणी केल्यानंतर एकूण 30 विद्यार्थ्यांना बाधा झाल्याचे आरोग्य विभागाने म्हटले असून एका शिक्षकालाही लागण झाली आहे.
या शाळेत 34 शिक्षक शिकवत होते. कोरोनाची लागण झालेल्या विद्यार्थ्यांमध्ये सर्वाधिक लागण मुलींना झाली आहे. या आश्रमशाळेतील 24 मुली कोरोना पॉझिटिव्ह असून सहा मुलेही कोरोनाबाधित आहेत. यातील नऊ मुलींना ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. तर, इतर विद्यार्थ्यांना आश्रमशाळेतच विलगीकरण कक्ष स्थापन करुन वैद्यकीय टीमच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे.








