माजी खासदार धनंजय महाडिक यांचा आरोप
सत्तेचा गैरवापर करत प्रशासनाची फसवणुक
प्रतिनिधी / कोल्हापूर
जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील यांनी महापालिकेचा सुमारे 15 कोटी घरफाळा बुडवला आहे. ते भागीदार असलेल्या सयाजी हॉटेल व त्या शेजारील मॉलची चुकीची माहिती देत सत्तेचा गैरवापर करत त्यांनी प्रशासनाची फसवणुक केल्याचा आरोप माजी खासदार धनंजय महाडिक यांनी पत्रकार परिषदेत केला. तसेच भाजप-ताराराणी आघाडीच्या सदस्यांनी हा प्रकार वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिला. मात्र दबावापोटी प्रशासन कारवाई करत नाही. पुढील आठ दिवसात महापालिकेने या मिळकतींचा रितसर घरफाळा वसुल करावा, अन्यथा महापालिकेच्यासमोर उपोषण करण्याचा इशारा महाडिक यांनी दिला.
माजी खासदार धनंजय महाडिक म्हणाले, जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे संचालक असलेल्या सयाजी हॉटेल व त्या शेजारील डी.वाय.पी. मॉलची घरफाळा आकारणी पुर्णपणे चुकीची व बेकायदेशीर झाली आहे. मॉलमध्ये सुमारे 23 भाडेकरु असूनही संपूर्ण मॉल मालक वापरात दाखविण्यात आला आहे. मिळकत भाड्याने दिल्यास व्यावसायिक घरफाळ्यानुसार घरफाळा रक्कमेत दिडपट वाढ होते. मात्र पालकमंत्री पाटील यांनी सत्तेचा गैरवापर करत मॉलमध्ये अनेक कंपन्यांना गाळे भाड्याने देवूनही मॉल मालक वापरात दाखवला आहे. अशी चुकीची माहिती देवून महापालिकेची सुमारे 15 कोटींचे फसवणुक केल्याचा आरोप महाडिक यांनी केला. पत्रकार परिषदेला माजी महापौर सुनील कदम, ताराराणी आघाडीचे माजी गटनेते सत्यजीत कदम, माजी नगरसेवक राजसिंह शेळके आदी उपस्थित होते.
तर नागरिकांनीही घरफाळा भरु नये
पालकमंत्र्यांनी फसवणुक करत महापालिकेचे 15 कोटी बुडवले आहेत. हा सर्व प्रकार माहित असूनही प्रशासन दबावापोटी त्यांच्यावर कारवाई करत नाही. मात्र सर्वसामान्य जनतेकडून सक्तीने घरफाळा वसुल केला जातो. मग प्रामाणिकपणे घरफाळा भरणाऱया कोल्हापूरकरांवर हा अन्याय आहे. त्यामुळे जोपर्यंत सयाजी हॉटेल, डीवायपी मॉलची रितसर दंडव्याजासह घरफाळा वसुली होत नाही तो पर्यंत नागरिकांनीही घरफाळा भरु नये, असे आवाहन माजी खासदार महाडिक यांनी केले.
ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कला 20 वर्ष घरफाळाच नाही
ड्रीमवर्ल्ड वॉटर पार्कचा घरफाळा वर्षाला 3 लाख 54 हजार इतका होतो. मात्र गेली 20 वर्ष हा घरफाळाही पालकमंत्र्यांनी भरलेला नाही. महापालिकेनेही घरफाळा वसुल न करता घरफाळा शुन्य दाखवला आहे. जर येथून उत्पन्न घेतले जात असेल तर घरफाळा शुन्य कसा, असा प्रश्न उपस्थित करत ड्रीमवर्ल्डचाही घरफाळा रितसर वसुल करण्याची मागणी महाडिक यांनी केली.
घरफाळा, पाणीपट्टी वाढ करु देणार नाही
महापालिका प्रशासन आर्थिक तुट भरुन काढण्यासाठी घरफाळा आणि पाणीपट्टीमध्ये वाढ करण्याचा विचार करत आहे. एकीकडे धनदांडगे, राजकीय पुढारी यांच्या मिळकतींची घरफाळा आकारणी करणार नाही. शहरातील सुमारे 2 हजार मिळकतींची कर आकरणी न करता शुन्य कर दाखविण्यात आला आहे. अशांकडून रितसर कर आकारणी केल्यास महापालिकेची आर्थिक तुट नक्कीच भरुन निघेल. धनदांडगे, राजकीय पुढाऱयांना सुट देवून सर्वसामान्य नागरिकांवर जर अशा पद्धतीने कर वाढ लादली जाणार असेल तर हा प्रकार खपवून घेणार नाही. कर वाढील भाजप-ताराराणी आघाडीचा विरोधच राहणार असून कोणत्याही परिस्थितीत घरफाळा, पाणीपट्टी वाढ करु देणार नसल्याचे महाडिक यांनी स्पष्ट केले.









