गुन्हे प्रकटीकरण शाखेची कामगिरी, सात तोळे सोन्यासह रोकड हस्तगत
वार्ताहर/ कराड
जिल्हय़ाचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांच्या स्वागत रॅलीत गर्दीचा फायदा घेऊन कार्यकर्ते, पदाधिकाऱयांच्या गळयातील सोन्याच्या चेन व पैशाची पाकिटे लंपास करणाऱया टोळीतील तीन संशयितांना गजाआड करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी कराडच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने केली आहे. अबू उर्फ नवनाथ भीमराव उपळकर (माजी ग्रामपंचायत सदस्य, वय 50, रा. गांधीनगर, बीड), नितीन अंकुश गायकवाड (वय 30, रा. सुभाष कॉलनी, पेठ, बीड), बाबू रामा इटकर (वय 50, मुळ रा. गांधीनगर, बीड. सध्या रा. शिरूरू, बीड) अशी अटक करण्यात आलेल्या संशयितांची नावे आहेत. त्यांच्याकडून सात तोळे सोने व रोख रक्कम असा सव्वा दोन लाखांचा ऐवज हस्तगत करण्यात आला आहे.
बाळासाहेब पाटील यांनी कॅबिनेट मंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर 5 जानेवारी रोजी त्यांची कराड शहरातून भव्य स्वागत रॅली काढण्यात आली होती. या रॅलीमध्ये अबू उपळकर, नितीन गायकवाड, बाबू इटकर व अन्य एकजण यांनी गर्दीचा फायदा घेऊन लोकांच्या गळ्यातील चेन, पाकिटे चोरी लंपास केली होती. याबाबत कराड शहर पोलीस ठाण्यात अनेक तक्रारी दाखल झाल्या होत्या. गुन्हे प्रकटीकरण शाखेने शहर व परिसरातील सर्व रेकॉर्डवरील गुन्हेगारांचा शोध घेतला असता काही धागेदोरे पोलिसांच्या हाती लागले. यावेळी पोलिसांनी मंत्री पाटील यांच्या स्वागत रॅलीचे व्हीडिओ शुटींग पाहिले असता अबू उपळकर, नितीन गायकवाड, बाबू इटकर व अन्य एकजण यांच्या हालचाली व ज्या ज्या ठिकाणी गुन्हा घडलेला, त्या त्या ठिकाणावर त्यांचे फुटेज मिळाले. सदरचे फुटेज पोलिसांनी गोपनीय बातमीदारांच्या मदतीने व इतर जिल्हय़ातील पोलीस अधिकाऱयांच्या मदतीने तपासले. सर्व संशयित हे बीड जिह्यातील पेठ, बीड पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार उपअधीक्षक सुरज गुरव यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक विजय गोडसे, साहाय्यक फौजदार राजेंद्र पुजारी, जयसिंग राजगे, सचिन साळुंखे, संजय जाधव यांच्या पथकाने बीड येथील गांधीनगर येथे जाऊन वेशभूषा बदलून अबू उपळकर, नितीन गायकवाड, बाबू इटकर तिघांना अटक केली. या गुन्हय़ातील आणखी एक संशयित फरार असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत.
वेशभूषा बदलून पोलिसांची कामगिरी
पाकिटचोरी, चेनस्नॅचिंग करणाऱया टोळीच्या शोधात गेल्यानंतर कराड गुन्हे अन्वेषण विभागाचे पथक बीड येथील गांधीनगर येथे गेल्यानंतर गावात जागोजागी पत्त्याचे डाव रंगले होते. संशयितांचा शोध घेताना पोलिसांना सुद्धा त्याच गावातील लोक जसे वेशभूषा करतात, त्याच पद्धतीची वेशभूषा करून त्यांच्याबरोबर पत्याचा डाव टाकावा लागला. तसेच या गावातील सर्रास लोक हे घरफोडी, चेनस्नॅचिंग यासारख्या चोऱया करतात.
अनेक रॅली, सभा व यात्रांतील गुन्हे उघड होण्याची शक्यता
अटक करण्यात आलेल्या संशयितांची टोळी असून ते राज्यभरातील रॅली, सभा, यात्रा आदी गर्दीची ठिकाणे हेरून त्या ठिकाणी चोऱया करतात. नेत्यांच्या रॅलीत जाताना हे चोरटे नेत्यांप्रमाणेच पांढरी शुभ्र वस्त्रे परिधान करतात. रॅलीत ते नेत्यांच्या जवळजवळ फिरतात. त्यामुळे कोणाला शंका येत नाही. गर्दीतील सावज हेरून गळयातील चेन किंवा पाकिट लंपास करतात. त्यांच्या अटकेमुळे त्यांनी राज्यभरात अन्य ठिकाणी अशा चोऱया केल्या आहेत का? याचा तपास पोलीस करीत आहेत.
पृथ्वीराज चव्हाण यांच्या रॅलीतील चोरटे सापडणार का?
आमदार पृथ्वीराज चव्हाण यांचा विधानसभा निवडणुकीचा अर्ज दाखल करताना जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात आले होते. यावेळी निघालेल्या रॅलीतही अनेक चेन स्नॅचिंग व पाकिटे चोरीच्या घटना घडल्या होत्या. याचाही तपास या संशयितांकडे होणार आहे. या रॅलीत हातसफाई करणारे चोरटे शोधण्याचेही काम पोलीस यंत्रणेला करावे लागणार आहे.









