प्रतिनिधी/ कराड
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज भरण्याच्या पहिल्याच दिवशी कराड सोसायटी मतदारसंघातून दिवंगत विलासराव पाटील -उंडाळकर यांचे सुपूत्र ऍड. उदयसिंह पाटील यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. दरम्यान, याच दिवशी राज्याचे सहकार व पणन मंत्री तथा पालकमंत्री बाळासाहेब पाटील यांनी दक्षिण कराडमध्ये नेते आणि सोसायटी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. त्यामुळे कराड सोसायटी मतदारसंघात घमासान लढतीचे संकेत मिळत आहेत.
कराड सोसायटी मतदारसंघाचे सुमारे 50 वर्षांपेक्षा जास्त काळ जिल्हा बँकेत प्रतिनिधीत्व करणारे ज्येष्ठ नेते दिवंगत विलासकाका पाटील – उंडाळकर यांच्या पश्चात निवडणूक होत आहे. या पारंपरिक मतदारसंघात आता काकांचे सुपूत्र ऍड. उदयसिंह पाटील यांनी दावा करत पहिल्याच दिवशी अर्ज दाखल करत इरादा स्पष्ट केला आहे. एकीकडे उदयसिंह पाटील अर्ज दाखल करत असताना सहकार मंत्री बाळासाहेब पाटील दिवसभर दक्षिण कराडमध्ये नेते आणि सोसायटी मतदारांच्या भेटीगाठी घेत होते. या प्रामुख्याने कृष्णा सहकारी कारखान्याचे उपाध्यक्ष जगदीश जगताप, ज्येष्ठ नेते जयसिंगराव पाटील, ऍड. आनंदराव पाटील यांच्यासह कृष्णाकाठच्या तसेच उंडाळे, काले विभागातील सोसायटी मतदारांच्या भेटीगाठी घेतल्या. सहकार मंत्र्यांनी प्रत्यक्षपणे भेटीगाठी घेण्यास सुरूवात केल्याने राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे. बाळासाहेब पाटील हे कराड सोसायटी मतदारसंघातूनच लढणार असल्याचे संकेत या माध्यमातून मिळत आहेत. तसे झाल्यास घमासान लढत या मतदारसंघात होणार असून या लढतीकडे राज्याचे लक्ष लागणार आहे.
कराड सोसायटी मतदारसंघात 140 मते आहेत. यापूर्वी दिवंगत विलासकाकांना या मतदारसंघात आव्हान देण्याचा प्रयत्न झाला होता. मात्र त्यात यश आले नव्हते. आता बदलत्या समीकरणांच्या पार्श्वभूमीवर या मतदारसंघातील निवडणुकीकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. उमेदवारी अर्ज माघारीनंतर या मतदारसंघातील चित्र स्पष्ट होणार आहे.









