वृत्त संस्था/ मुंबई
भारतीय संघातील माजी यष्टीरक्षक आणि सलामीचा फलंदाज पार्थिव पटेलला मुंबई इंडियन्स संघाने आपल्या प्रशिक्षण पथकात सामावून घेतले आहे. 35 वर्षीय पार्थिव पटेलने आंतरराष्ट्रीय क्रिकेट क्षेत्रातून निवृत्तीची घोषणा नुकतीच केली.
आयपीएल क्रिकेट स्पर्धेत पार्थिव पटेल मुंबई इंडियन्स संघाकडून खेळत होता. 2015, 2017 साली आयपीएल चषक जिंकणाऱया मुंबई इंडियन्स संघामध्ये त्याचा समावेश होता. मुंबई इंडियन्स प्रँचायझी आकाश अंबानी यांनी पटेलच्या कामगिरीचे कौतुक केले आहे. क्रिकेटमधून निवृत्त झाल्यानंतर मुंबई इंडियन्सच्या व्यवस्थापन समितीने पार्थिव पटेलला आपल्या प्रशिक्षक वर्गामध्ये सहभागी होण्याची संधी दिली. पार्थिव पटेलने याबाबत व्यवस्थापनाचे आभार मानले आहे. आयपीएल प्रँचायजीसमवेत असलेल्या निवडक क्रिकेटपटूंच्या यादीमध्ये आता पटेलचाही समावेश आहे. या यादीमध्ये व्ही.व्ही.एस.लक्ष्मण, मोहम्मद कैफ, अनिल कुंबळे, वासीम जाफर आणि अभिषेक नायर यांचा समावेश आहे. पार्थिव पटेलने आपल्या क्रिकेट कारकीर्दीत गुजरात संघाचे नेतृत्व करताना विजय हजारे आणि रणजी करंडक क्रिकेट स्पर्धा गुजरातला जिंकून दिली होती. पार्थिवने प्रथमश्रेणी क्रिकेटमध्ये 27 शतकांसह 11240 धावा जमविल्या असून यष्टीरक्षणात त्याने 486 झेल घेतले आणि 77 यष्टीचीत केले आहेत.









