बातमीदार / खानापूर
कार्यालयीन वेळेत जनतेची कामे करण्यापेक्षा ग्रामपंचायत कर्मचाऱयांसमवेत पार्टीत मग्न असणाऱया पीडीओंची बदली करा, या मागणीचे निवेदन कसबा नंदगड ग्राम पंचायतीच्या सदस्यांनी ता. पं. कार्यकारी अधिकाऱयांना सोमवारी दिले.
कसबा नंदगड ग्राम पंचायतीचे पीडीओ सोमशेखर यांनी ग्राम पंचायत कार्यालयाच्या वेळेत काही ग्राम पंचायत कर्मचाऱयांसह एका शेतवडीत पार्टीचे आयोजन केले होते. दरम्यानच्या काळात ग्राम पंचायत हद्दीतील अनेक लोक लग्न समारंभाच्या परवानगीसाठी व अन्य काही कामासाठी ग्रामपंचायत कार्यालयात दाखल झाले होते. यासंबंधी ग्रामपंचायत पीडीओंना याची माहिती दिली असली तरी त्यांनी ग्रामपंचायत सदस्यांसह लोकांनाही जुमानले
नाही.
पीडीआंsच्या बदलीची ग्रामपंचायत सदस्यांची मागणी
काही ग्रामस्थांनी पीडीओ व्यस्त असलेल्या पार्टीच्या ठिकाणी जाऊन फोटोही घेतले. तरीही पीडीओंनी याला दाद दिली नाही, किंवा त्यानंतरही ते ग्रामपंचायत कार्यालयाकडे फिरकलेसुद्धा नाहीत. त्यामुळे कामानिमित्त आलेल्या जनतेला विनाकारण ताटकळत बसावे लागले. जनतेला झालेला हा त्रास त्यांनी ग्राम पंचायतीच्या सर्व सदस्यांच्या कानी घातला. या घटनेमुळे तडकाफडकी जागे झालेल्या ग्रामपंचायत सदस्यांनी आता पीडीओ बदलीचे काम हाती घेतले आहे. शिवाय ग्रामपंचायत सदस्यांना विश्वासात न घेता पीडीओ काम करत असल्याचा ठपकाही ठेवला आहे. पीडीओ बदलीसंदर्भात सोमवारी ग्रामपंचायत सदस्यांनी ता. पं. कार्यालय गाठून सदरचे निवेदन सादर केले आहे. या घटनेत पीडीआंsसह ग्रामपंचायत कार्यालयातील नोकरही तितकेच जबाबदार आहेत. त्यांच्यावरील कारवाईबाबत सदस्यांना विचारताच त्यांनी आपल्या चुकीबद्दल माफी मागितली असल्याचे ग्रामपंचायत सदस्यांनी वार्ताहरांशी बोलताना सांगितले. या घटनेत मात्र पीडीओंना प्रामुख्याने जबाबदार धरून त्यांच्या बदलीवर ग्रामपंचायत सदस्य ठाम राहिले आहेत.
निवेदन देताना ग्राम पंचायत अध्यक्ष महाबळेश्वर धबाले, उपाध्यक्षा नेत्रा लोहार, ग्राम पंचायत सदस्य प्रवीण पाटील, बशीर देशपाईक, सुजाता पाटील, नंदा कोलकारसह अन्य सदस्य उपस्थित होते.









