प्रतिनिधी/ मडगाव
तळेबांद -दवर्ली येथील एका इसमाची पार्क केलेली दुचाकी अवघ्या 15 मिनिटात चोरुन नेणाऱया तळेबांद दवर्ली येथील मॅकेनिकला पोलिसांनी अटक केली आहे. त्याच्याकडून चोरीचे वाहन जप्त करण्यात आले आहे.
मायणा -कुडतरी पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक शिवराम वायंगणकर यांनी या प्रकरणी सविस्तर माहिती दिली.
तक्रारदार अन्सार अहमद याने आपली जीए-08-पी-5229 क्रमांकाची दुचाकी दवर्ली येथील एका दुकानापुढे 18 ऑगस्ट 2021 रोजी सायंकाळी 6 वाजता पार्क करुन ठेवली होती. 15 मिनिटानी म्हणजे सव्वा सहा वाजता सदर व्यक्ती पार्क केलेल्या जागी आली असता या 15 निमिटाच्या काळात त्याची दुचाकी अज्ञात आरोपीने तेथून चोरली होती.
या प्रकाराची माहिती या व्यक्तीने मायणा- कुडतरी पोलिसांना दिली तेव्हा पोलिसांनी भारतीय दंड संहितेच्या 379 कलमाखाली गुन्हा नोंद केला आणि या चोरीप्रकरणातील तपास सुरु केला.
पोलीस तपास सुरु झाला. श्री वायंगणकर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक महेश वेळीप, साहाय्यक उपनिरीक्षक उदय वेळीप, रिझवान शेख, धिरज नाईक व किशोर गावकर यांनी संयुक्तरित्या तपास करुन झरीना अपार्टमेंट, दवर्ली येथील 26 वर्षीय मेहबूब पठाण याला चोरीच्या आरोपावरुन ताब्यात घेऊन नंतर भारतीय दंड संहितेच्या 379 कलमाखाली अटक केली आणि त्याच्याकडून चोरीस गेलेली वरील क्रमांकाची दुचाकी जप्त केली.









