नवरात्रोत्सवात बिंदू चौकातील पार्किग हाऊसफुल्लचा परिणाम, आर्थिक संकटात असणाऱ्या केएमटीला दिलासा
विनोद सावंत/कोल्हापूर
कोरोनापासून आर्थिक अडचणीत असणाऱ्या केएमटीला पे अँड पार्किंग आधार ठरत आहे. नवरात्रोत्सवामध्ये तर बिंदू चौक येथील पार्किंग भाविकांमुळे हाऊसफुल्ल झाले होते. केवळ 9 दिवसांत येथील एकमेव पार्किंगमधून 1 लाख 70 हजार 570 रुपये इतकी कमाई झाली आहे.
कोल्हापूरमध्ये गेल्या दीड वर्षापासून कोरोनामुळे अनेकांना आर्थिक समस्याला समोरे जावे लागले. लॉकडाऊनमुळे सर्वच व्यवहार ठप्प होते. या संकटातून केएमटीही सुटली नाही. सर्वच बस बंद राहिल्याने उत्पन्न थांबले. अगोदरच 4 लाख रुपयांचा रोज तोटा होत होता. यामध्ये कोरोनामुळे आणखीन भरच पडली. कोरोनाच्या उपाययोजनेसाठी केवळ 25 बसेस मार्गस्थ होत्या. उर्वरीत 85 बसेस वर्कशॉपमध्ये लावून होत्या. उत्पन्न शुन्य आणि कामगार पगार, मेंटनन्स असा खर्च मात्र, सुरू अशी स्थिती होती. कर्मचाऱ्यांचे पगार कपातही या दरम्यान करण्यात आली.
सध्या कोरोनाची साथ नियंत्रणात आली आहे. रोज 37 बसेस मार्गस्थ आहेत. उर्वरीत बसेस अजुनही बंदच आहेत. आर्थिक संकट अद्यपही कायम आहे. अशा स्थितीमध्ये महापालिकेने केएमटीला दिलेले `पे अँड पार्किंग’चा काही अंशी आधार ठरत आहे.
दीड वर्षाने बिंदू चौकातील पार्किंगमधून उत्पन्न
केएमटीला सहावा वेतन आयोग लागू केल्यानंतर उत्पन्नाचे स्त्राsत वाढावे म्हणून शहरातील 11 पे अँड पार्किंगचे ठेके दिले. सध्या चार ते पाच ठिकाणी पार्किंग केले जात आहे. यामध्ये अंबाबाई मंदिर नजीक असल्याने बिंदू चौक येथील पे अँड पार्कींगमधून सर्वाधिक उत्पन्न मिळते. कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून येथील पार्किंग बंद होते. मंदिर सुरू झाल्याने पुन्हा गर्दी होऊ लागली आहे. नवरात्रोत्सवात तर रोज 9 दिवस पार्किंग हाऊसफुल्ल होते.
पार्किंग दर प्रति तास
दुचाकी वाहन-5 रूपये
चारचाकी वाहन-25 रूपये
अवजड वाहन -30 रूपये
रोजची 20 हजाराची कमाई
बिंदू चौक पार्कींग येथील पार्किंगमध्ये इतरवेळी रोज 10 ते 15 हजारांचे उत्पन्न मिळते. नवरात्रोत्सवात 7 ते 15 ऑक्टोबर दरम्यान रोज सुमारे 20 हजार प्रमाणे 1 लाख 70 हजार रूपये उत्पन्न मिळाले आहे. दिवाळी सुट्टीमध्ये रोज 30 हजार उत्पन्न मिळेल, अशी अपेक्षा आहे.
पी.एन. गुरव, प्रकल्प अधिकारी, केएमटी
गाडीअड्डा पार्किंगचा वापर होणे गरजेचे
शहराच्या व्हिनस कॉर्नर येथील गाडीअड्डा येथे महापालिकेच्यावतीने पार्किंगची सोय केली आहे. मात्र, या ठिकाणी वाहने पार्किंग होत नाहीत. बिंदू चौकातील वाहतुकीची कोंडी टाळण्यासाठी गाडीअड्डा येथील पार्किंगचा वापर होणे गरजेचा आहे. यासाठी महापालिका, शहर वाहतूक शाखा यांनी नियोजन केल्यास हे शक्य आहे.