दहाव्या दिवशी 9 पदके, तेजस्विन शंकर, मोहम्मद अफसल यांना रौप्य, प्रीती पवार, नरेंदर यांना मुष्टियुद्धमध्ये,
अर्जुन-सुनील, विथ्या रामराज, प्रवीण चित्रावेल यांना कांस्य
वृत्तसंस्था/ हांगझाऊ, चीन
19 व्या आशियाई क्रीडा स्पर्धेत मंगळवारी भारताने अॅथलेटिक्सने 2 सुवर्णासह सहा पदके पटकावली तर भारतीय महिला बॉक्सर प्रीती पवार व पुरुषांच्या कॅनोई डबलमध्ये अर्जुन सिंग व सुनील सिंग सलाम यांनी कांस्यपदके पटकावली. पारुल चौधरीने महिलांच्या 5000 मी.मध्ये तर अन्नू राणीने महिलांच्या भालाफेकमध्ये सुवर्णपदके पटकावली.
महिलांच्या 5000 मी. शर्यतीत 28 वर्षीय पारुल चौधरीने सनसनाटी कामगिरी करीत सुवर्णपदक पटकावण्याचा पराक्रम केला. जपानच्या रिरिका हिरोनाकाने तिला कडवी झुंज दिली. पण 40 मीटर्समध्ये पारुलने तिला मागे टाकत 15:14.75 मि. अवधीत शर्यत पूर्ण करून पहिले स्थान पटकावले. तिचे हे या स्पर्धेतील दुसरे पदक असून याआधी तिने महिलांच्या 3000 मी. स्टीपलचेसमध्ये रौप्यपदक मिळविले आहे. कझाकच्या कॅरोलिन चेपकोएन किपकिरुइने 15:23.12 मि. वेळ घेत कांस्य मिळविले.
अन्नू राणीस सुवर्ण

महिलांच्या भालाफेकमध्ये 31 वर्षीय अन्नू राणीने मोसमातील सर्वोत्तम नोंदवताना चौथ्या प्रयत्नात 62.92 मी. भालाफेक करीत सुवर्ण निश्चित केले. लंकेच्या नादीशा दिलहान व चीनच्या हुइहुई लियू यांनी अनुक्रमे 61.57 व 61.29 मी. भालाफेक करीत रौप्य व कांस्यपदक मिळविले.
रामराजला हर्डल्सचे कांस्य
25 वर्षीय विथ्या रामराजने महिलांच्या 400 मी. हर्डल्समध्ये 55.68 सेकंदाची वेळ नोंदवत कांस्य मिळविले. तिची ही सर्वोत्तम कामगिरी नव्हती, तरीही तिला तिसरे स्थान मिळाले. तिने 1984 मध्ये पीटी उषाने नोंदवलेल्या हर्डल्स राष्ट्रीय विक्रमाशी बरोबरी केली. विथ्याने याआधी 4×400 मी. मिश्र रिलेमध्येही रौप्य मिळविले आहे. या प्रकारात बहरिनच्या ओलुवाकेमी मुजिदात अदेकोयाने स्पर्धाविक्रमासह सुवर्ण (54.45 से.) व चीनच्या जैडी मो हिने 55.01 से. वेळ नोंदवत रौप्य पटकावले. पुरुषांच्या 400 मी. हर्डल्समध्ये यशास पालाक्षा व संतोष कुमार यांनी अनुक्रमे पाचवे व सहावे स्थान मिळविले.
तेजस्विन, मोहम्मद अफसल यांना रौप्य

तेजस्विन शंकरने पुरुषांच्या डेकॅथ्लॉनमध्ये राष्ट्रीय विक्रम नोंदवत 7666 गुणांसह रौप्यपदक मिळविले. यामधील शेवटच्या 1500 मी. शर्यतीत त्याने चौथे स्थान मिळविले. 1974 नंतर या क्रीडाप्रकारात भारताला मिळालेले हे पहिलेच पदक आहे. त्यावर्षी विजय सिंग चौहानने पदक मिळविले होते. याआधीचा राष्ट्रीय विक्रम भरतइंदर सिंगच्या नावावर होता. त्याने 7658 गुण मिळविले होते. तो विक्रम तेजस्विनने येथे मागे टाकला. मोहम्मद अफसल पी. आणि प्रवीण चित्रावेल यांनीही अनुक्रमे पुरुषांच्या 800 मी. शर्यतीत व तिहेरी उडीत रौप्य व कांस्यपदके मिळविली. अफसलने 1:48.43 से. वेळ नेंदवली तर प्रवीणने 16.68 मी. उडी घेतली. तिहेरी उडीत भारताच्या अबूबाकर अब्दुल्लाने 16.62 मी. अंतर नोंदवत चौथे स्थान मिळविले.
प्रीती, नरेंदरला कांस्य
महिलांच्या 54 किलो वजन गटाच्या उपांत्य फेरीत भारताच्या प्रीती पवारला चीनच्या विद्यमान फ्लायवेट चॅम्पियन चँग युआनकडून पराभव स्वीकारावा लागल्याने तिला कांस्यपदकावर समाधान मानावे लागले. प्रीतीने या लढतीत झुंजार प्रदर्शन केले. पण अखेर तिला 0-5 अशा फरकाने पराभूत व्हावे लागले. तिने याआधीच ऑलिम्पिक कोटा मिळविला आहे. त्याचप्रमाणे पुरुषांच्या 92 किलोवरील गटात नरेंदर बरवालला उपांत्य फेरीत पराभूत व्हावे लागल्याने त्याला कांस्यपदक मिळाले.
कॅनोई डबलमध्ये अर्जुन-सुनीलला कांस्य

पुरुषांच्या कॅनोई डबल 1000 मध्ये अर्जुन सिंग व सुनील सिंग सलाम यांनी कांस्य मिळवित ऐतिहासिक यश मिळविले. अर्जुन-सुनील यांनी 3:53.329 से. वेळ नोंदवत तिसरे स्थान मिळविले. या स्पर्धेच्या इतिहासात भारताला मिळालेले हे या प्रकारातील दुसरे पदक आहे. यापूर्वी 1994 हिरोशिमा स्पर्धेत भारताने याच प्रकारात कांस्यपदक मिळविले होते. येथील स्पर्धेत उझ्बेकच्या शोखमुरोद खोलमुराडोव्ह-नुरिस्लोम तुख्तासिन उगली यांनी 3:43.796 से. वेळ नोंदवत सुवर्ण व कझाकच्या तिमोफे येमेलयानोव्ह-सर्जी येमेलयानोव्ह यांनी 3:49.991 से. वेळ घेत रौप्यपदक मिळविले.
मंगळवारचे पदकविजेते
पारुल चौधरी : 5000 मी., सुवर्ण
अन्नू राणी : भालाफेक, सुवर्ण
तेजस्विन शंकर : डेकॅथ्लॉन, रौप्य
मोहम्मद अफसल : 800 मी., रौप्य
प्रवीण चित्रावेल : तिहेरी उडी, कांस्य
विथ्या रामराज : 400 मी. हर्डल्स, कांस्य
प्रीती पवार : बॉक्सिंग, कांस्य
नरेंदर बरवाल : बॉक्सिंग, कांस्य
अर्जुन सिंग-सुनील सिंग : कॅनोई डबल, कांस्य









