प्रतिनिधी / बेळगाव
एकीकडे विजेचा अपव्यय टाळा असा संदेश देण्यात येतो. दुसरीकडे रस्त्यावरील पथदीप दिवसाढवळय़ा सुरू असल्याने परस्पर विरोधाभास निर्माण झाल्याने नागरिकांमधून सखेद आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. पारिजात कॉलनी, वडगाव-अनगोळ रोडवर दिवसाही पथदीप सुरू ठेवण्याचा प्रकार घडत आहे. गेल्या दोन दिवसांपासून ही परिस्थिती जैसे थे असून येथील पथदीप बंद करण्याकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पथदिपांचे कामकाज पाहण्यासाठी महापालिकेची स्वतंत्र यंत्रणा आहे. पण याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. शहरातील कोणत्या ना कोणत्या भागातील पथदीप दिवसा तर काही पथदीप संध्याकाळच्या वेळेस सुरू असतात. काही पथदिपांना दिवे नसल्याने अनेक भागात अंधार पसरलेला पाहायला मिळतो. गेल्या दोन दिवसांपासून पारिजात कॉलनीत पथदीप सुरू असल्याने महापालिकेच्या कंत्राटी कामगारांनी सक्षम होण्याची गरज निर्माण होत असून त्यांच्या या हलगर्जीपणामुळे नागरिकांमधून नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.









