प्रतिनिधी / रत्नागिरी :
डिसेंबर संपला तरी थंडीचा पत्ताच नसल्याने हवालदिल झालेल्या आंबा बागायदार व सामान्य जनेतेलाही गेल्या दोन दिवसांपासून दिलासा मिळाला आहे. नववर्षाच्या पहाटेपासूनच थंडीचा कडाका वाढला आहे. जिल्हय़ात शहरासह ग्रामीण भागातील तापमानाचा पारा 20 अंशापर्यंत घसरल्याने सायंकाळनंतर हुडहुडी भरू लागली आहे. या थंडीमुळे आंबा व काजू बागायतदारांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
यावर्षी डिसेंबर संपला तरी हिवाळा गायब असल्यासारखे चित्र होते. गेल्या दोन महिन्यापासून अवकाळी पाऊस, ढगाळ वातावरणाने येथील बागायतदार शेतकऱयांना चिंताग्रस्त करून टाकले होते. त्यात एकामागोमाग आलेल्या वादळांचाही फटका बसला. यावेळी पावसाचे प्रमाण अधिक असल्याने थंडीचा कडाकाही वाढेल असा अंदाज होता. मात्र डिसेंबर संपत आला तरी थंडीचा जोर म्हणावा तसा दिसत नव्हता.
त्याचा परिणाम आंबा पिकांवर होण्याची भीती बागायदारांकडून व्यक्त करण्यात आली. डिसेंबर महिन्यात केवळ 5 ते 10 टक्के आंब्यांच्या झाडांना मोहोर आलेला असल्याची स्थिती आहे. तापमान 20 अंश सेल्सियसपर्यंत गेल्यास मोहोर येण्यास वातावरण पोषक ठरते. त्यामुळे आता घसरलेल्या तापमानामुळे हे वातावरण आंबा पिकास लाभदायी ठरणार असल्याचे बागायतदारांमधून सांगितले जात आहे.
गेल्या तीन दिवसांपासून राज्यभरात तापमानात मोठी घसरण झाली आहे. जिल्ह्य़ातही असेच चित्र असून काही ठिकाणी पारा 20 अंश सेल्सियसपर्यंत खाली उतरला अहे. ग्रामीण भागात प्रचंड गारठा जाणवत आहे. सकाळच्यावेळी नदीकाठच्या भागात धुक्याची चादर दिसू लागली आहे. थंडीच्या कडाक्याने आता शेकोटय़ाही पेटू लागल्या आहेत. 6 जानेवारीपर्यंत गोव्यासह संपूर्ण महाराष्ट्रात हवामान कोरडे राहण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. त्यामुळे थंडीचा कडाका वाढणार आहे.









