संतिबस्तवाड येथील हभप मष्णू माळी यांची अनोखी विठ्ठलभक्ती
आण्णाप्पा पाटील / बहाद्दरवाडी

‘हेचि दान देगा देवा, तुझा विसर न व्हावा।
गुण गाईन आवडी, हेचि माझी सर्व जोडी।।न लगे मुक्ती आणि संपदा, संतसंग देई सदा। तुका म्हणे गर्भवासी, सुखे घालावे आम्हासी।।’
संत तुकाराम महाराजांच्या या अभंगाप्रमाणेच विठ्ठलाच्या भक्तीत तल्लीन झालेले संतिबस्तवाड गावातील हभप मष्णू नारायण माळी हे होत. गेल्या 34 वर्षांपासून किणये येथील ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ात ते अविरत वीणासेवा करतात. 81 वर्षांच्या या वारकऱयाची विठ्ठलावर अपार श्रद्धा असल्याचे दिसून येते.
मलप्रभा-मुंगेत्री परिसर, बेळगाव दक्षिण व पश्चिम विभाग, किणये या मंडळाच्यावतीने बहाद्दरवाडी क्रॉस येथे आयोजित करण्यात येणाऱया दरवषीच्या ज्ञानेश्वरी पारायण सोहळय़ात कीर्तन-निरुपणाच्या कालावधीत हभप मष्णू माळी वीणासेवा करतात. गेल्या 34 वर्षांपासून एकही दिवस पारायण सोहळय़ात त्यांनी वीणासेवेमध्ये खंड पडू दिलेला नाही. विठ्ठलाच्या नामस्मरणामध्ये मला आतापर्यंत कोणताही आजार झालेला नाही किंवा थकवा वाटत नाही. 81 व्या वषीही भजनात तल्लीन होण्याचे बळ पांडुरंगानेच दिले आहे, असे माळी सांगतात.
आचार, विचार आणि उच्चार यांची साधना करतो तो वारकरी होय. गळय़ात माळ, हातात वीणा, कपाळावर गोपीचंदनाचा टिळा, खांद्यावर पताका, मनी शुद्ध भाव व मुखाने विठ्ठलाचे नामस्मरण करणारे मष्णू माळी हे या भागात सर्वांच्याच परिचयाचे आहेत. वयाच्या 12 व्या वर्षापासून त्यांना आध्यात्माची गोडी लागली. गावात पूर्वी संगीत भारुड भजन सुरू असायचे. हे भजन पाहण्यासाठी मष्णू माळी जात असत. त्यांना या संगीत भारुड भजनाची गोडी निर्माण झाली व वयाच्या 16 व्या वर्षापासून त्यांनी भारुड भजनात सहभाग घेण्यास सुरुवात केली. ‘यमाई माझे नाव’, जोहार मायबाप जोहार’, ‘कबीरदास’, आदींसह एकनाथी भारुड भजनामध्ये त्यांनी कलाकार म्हणून आपली कला सादर केली. या भारुड भजनाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे कार्य त्यांनी सुरू केले. टिळकवाडी येथील वैकुंठवासी दिगंबरपंत परुळेकर महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार गेल्या 40 वर्षांपूर्वी पंढरीची माळ घेऊन आषाढी वारीला सुरुवात केली. सलग 18 वर्षे त्यांनी पायी दिंडी केली. या दिंडीत जात-पात, वर्णभेद असे काहीच नसते. सर्व भक्त एकत्र येऊन पालखी सोहळय़ात गुण्यागोविंदाने सामील होतात. टाळमृदंगाचा आवाज व त्या आवाजाच्या पार्श्वभूमीवर सर्व भक्तमंडळी पांडुरंगाचे नाव घेत देहभान हरपून दिंडीत सहभागी झालेली असतात. पायी दिंडीमुळे विठ्ठलाच्या नामस्मरणाबरोबरच मानसिक समाधान मिळते, असेही त्यांनी सांगितले.
संतिबस्तवाड गावात दत्त मंदिर बांधण्यात आले. या मंदिरात विठ्ठल-रखुमाई, संत नामदेव, संत तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली, एकनाथ महाराज आदींच्या मूर्ती आहेत. गेल्या 40-45 वर्षांपासून मष्णू माळी हे दत्त मंदिरात येऊन सकाळी 7 वाजता नित्यनेमाने पूजाअर्चा करीत असतात. गावातील हभप ईश्वर कर्लेकर यांचे त्यांना वेळोवेळी मार्गदर्शन लाभले आहे.
मष्णू माळी हे एका शेतकरी कुटुंबातील आहेत. घरची परिस्थिती हलाखीची असल्यामुळे एखादा व्यवसाय करण्याचे त्यांनी ठरविले व त्यांना नक्षीकाम करण्याची आवड असल्यामंळे त्यांनी मंदिरांच्या कळसांचे बांधकाम हाती घेतले. त्यांनी आपल्या तरुण वयात महाराष्ट्र, वडगाव, खानापूर, झाडनावगे, कुडची, कुट्टलवाडी, संतिबस्तवाड किणये आदी परिसरातील सुमारे 79 मंदिरांच्या कळसांचे बांधकाम केले असल्याची माहिती त्यांनी दिली. एक कुशल कारागीर म्हणून त्यांनी या परिसरात आपला नावलौकिक मिळविला आहे. वय होत असल्यामुळे गेल्या पाच-सहा वर्षांपासून मंदिरांच्या कळसाचे काम करणे बंद केले आहे, असे सांगितले.कोरोनामुळे मागीलवषी आषाढी वारी एकादशीला पंढरपूरला जाता आले नाही, याची खंत त्यांनी व्यक्त केली. पंढरपुरातील विठ्ठलाचे दर्शन नियमितपणे चालू व्हावे व कधी एकदा सावळय़ा विठुरायाचे दर्शन घडेल, अशी आशा त्यांनी व्यक्त केली. संसार करत परमार्थ करावा, तसेच सध्याच्या तरुणांनी आपला पोटापाण्याचा उद्योग-व्यवसाय जिद्दीने करावा. हे करीत असताना भगवंताचे नामस्मरणही करावे, असे त्यांनी सांगितले. पत्नी रुक्मिणी यांची त्यांना मोलाची साथ लाभली आहे. यापुढेही आपली वीणासेवा अशीच चालू ठेवणार असल्याचे त्यांनी यावेळी बोलून दाखविले.









