प्रतिनिधी/ बेळगाव
इंग्रजी नववर्षाच्या पार्श्वभूमीवर गडकोटांवर होणारे अनुचित प्रकार टाळण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील दोडामार्ग तालुक्यातील मोरले येथील शिवभक्तांनी पारगड येथे गुरुवारी जागता पहारा दिला. या कार्यक्रमाला प्रमुख अतिथी म्हणून शिवप्रतिष्ठन बेळगावचे जिल्हाध्यक्ष किरण गावडे उपस्थित होते.
युवकांना मार्गदर्शन करताना किरण गावडे म्हणाले, हिंदवी स्वराज्याची स्थापना केल्यानंतर शिवछत्रपतींनी 32 मण सुवर्णसिंहासनावर राज्याभिषेक केला. संभाजी महाराजांच्या मृत्युनंतर यवनांनी रायगड काबिज करून सुवर्णसिंहासन तोडलं, लुटलं, नामशेष केलं. ते सिंहासन पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी दुर्गराज रायगडावर लाखो धारकऱयांच्या समवेत संकल्प करण्यात आला. या सुवर्णसिंहासनाला शिवभक्तांमधून निधीचा ओघ सुरू असल्याचे त्यांनी सांगितले. 32 मण म्हणजे 1 हजार 280 किलो वजनाचे सिंहासन थाटात स्थापन केले जाणार आहे. यासाठी प्रत्येकाने योगदान देणे गरजेचे आहे. वर्षातून एकदा रायगडावर सुवर्ण सिंहासनाच्या रक्षणासाठी 1 दिवस खडा पहारा द्यावयाचा आहे. त्यासाठी धारकऱयांनी अधिकाधिक नोंदणी करण्याचे आवाहन गावडे यांनी केले. पाश्चिमात्य संस्कृतीचे अनुकरण न करता गडाला जागता पहारा दिल्याबद्दल शिवभक्तांचे कौतुक केले. यावेळी मोठय़ा संख्येने शिवभक्त उपस्थित होते.









