कोगे गावातील पंत सांप्रदाय मंडळाचा अनोखा उपक्रम
कसबा बीड / प्रतिनिधी
कोगे तालुका करवीर येथील श्री पंत सांप्रदाय मंडळाकडून पारंपारिक रुढी परंपरेला फाटा देत बाहेरून मोलमजुरी करण्यासाठी आलेल्या व गरजू लोकांना पुरण पोळी दान देऊन होळी साजरी केली. हिंदू धर्मातील अनेक सणांपैकी धुलीवंदन हा सण आबालवृद्ध एकत्र येऊन साजरा करत असतात. या सणांमध्ये घराघरातून शेणी एकत्र केल्या जातात. त्याची होळी करून तिचे पूजन स्त्रियांनी व पुरुषांनी मिळून केल्यानंतर ही होळी पेटवली जाते. या होळीस नैवेद्य म्हणून पुरणपोळी व दही भात दाखवून त्यामध्ये दहन केले जाते.
पण अशा या रूढी परंपरा फाटा देत होळीमध्ये टाकली जाणारी पुरणपोळी व दही भात हा गरीब व गरजू ,तसेच बाहेर गावावरून रोजंदारीसाठी आलेल्या लोकांना या सणापासून वंचित राहू नयेत, या हेतूने सुरु केला आहे. श्री पंत सांप्रदाय मंडळाने हा एक वेगळाच पायंडा घातला म्हटले तर वावगे होणार नाही. गेली दहा वर्षे या मंडळाच्या कार्यकर्त्यांच्याकडून अशा पद्धतीने होळी साजरी केली जाते. यावेळी श्री पंत सांप्रदाय मंडळाचे सर्व सदस्य व तरुण युवा कार्यकर्ते उपस्थित होते.
‘पुरणपोळी गरजू लोकांच्या मुखी’ या अनोख्या उपक्रमांची दखल ‘दै. तरुण भारत’ च्या माध्यमातून समाजातील अनेक तरुण मंडळाच्या कार्यकर्त्यांच्यापर्यंत पोचवली जात आहे, असे मत श्री पंत सांप्रदाय मंडळ कोगे यांच्या कार्यकर्त्यांच्याकडून व्यक्त होत आहे.