भारताच्या विविध प्रांतात रांगोळी विविध नावांनी ओळखली जाते. रांगोळी रेखाटनाचे प्रकारदेखील विपुल आहेत. सण, समारंभ व शुभ कार्यापूर्वी आवर्जून रांगोळी रेखाटली जाते. हिंदू संस्कृतीमध्ये शुभ प्रतीक मानले जाते. गारगोटीच्या दगडापासून बनवण्यात येणारी ही पावडर, धान्य व पाने, फुलांच्या पाकळय़ांपासून रांगोळी सजवली जाते. तिचा मोठा इतिहास आहे. अलीकडे महिलांच्या बरोबरीने पुरूषांचाही रांगोळी रेखाटनात हातखंडा आहे.
रांगोळीत प्रवीण असलेले पण प्रसिद्धीपराङ्मुख असे कलाशिक्षक कंग्राळी खुर्द गावचे सुपूत्र रामचंद्र पाटील अर्थात आर. के. पाटील. ते याच नावाने सुपरिचित आहेत. त्यांना उपजतच कलेची आवड असल्यामुळे प्राथमिक शाळेपासून त्यांनी चित्रकला व रांगोळी कला जोपासली. मराठा मंडळ माध्यमिक विद्यालयात आल्यानंतर ते थोर कला शिक्षक आर. बी. पवार यांच्या संपर्कात आले. आर. के. सरांची चित्रकलेची आवड पाहून पवार सरांनी त्यांना मार्गदर्शन करण्यास सुरुवात केली. डी. एम. सी. ड्रॉई&ंग मास्टर परीक्षेत कर्नाटक राज्यात ते प्रथम क्रमांकाने उत्तीर्ण झाले. त्यानंतर ए. एम. (आर्ट मास्टर) राज्यात द्वितीय क्रमांक त्यांनी पटकावला. हे करत असतानाच आपले बी. ए. पर्यंतचे शिक्षणही पूर्ण केले. 1961 साली कॅन्टोन्मेंट मराठी शाळेत चित्रकला शिक्षक म्हणून ते रुजू झाले. 35 वर्षे दीर्घ सेवेनंतर 1997 मध्ये ते सेवानिवृत्त झाले. याच शाळेत दरवषी गणेशोत्सवानिमित्त होणाऱया रांगोळी प्रदर्शनात ते प्रमुख भूमिका बजावत.
आर. के. सरांनी आजपर्यंत अनेक ठिकाणी रांगोळी प्रदर्शनात सहभाग नोंदवलेला आहे. सार्वजनिक वाचनालय गणपत गल्ली, बेळगाव, कोल्हापूर (महाराष्ट्र) आणि आंध्रप्रदेशातील इरोड येथेही त्यांची रांगोळी प्रदर्शने भरलेली आहेत. त्यांच्या सहचारिणी वंदना पाटील यांचेही त्यांना मोलाचे सहकार्य मिळाले आहे. त्यांना एक विश्वासू आणि अजातशत्रू व्यक्ती म्हणूनच परिसरात ओळखले जाते. त्यांच्या प्रामाणिकपणाचे प्रमाणपत्र त्यांना वेळोवेळी गावातील नागरिकांकडून मिळत आलेली आहेत. त्या चोख हिशोब आणि प्रामाणिकपणा यांची सांगड झाल्यामुळे त्यांच्याकडे मार्कंडेय बांधकाम कमिटी-खजिनदार, लक्ष्मीदेवी यात्रा कमिटी खजिनदार, निळोबाराय सप्ताह कमिटी खजिनदार, ज्ञानेश्वर पारायण मंडळ खजिनदार म्हणून कार्यरत आहेत. याशिवाय दिवाळी सणावेळी किल्ले परीक्षक म्हणून ते कार्य करतात. जायंट्स ग्रुप ऑफ बेळगाव मेनच्यावतीने घेण्यात आलेल्या ड्रॉईंग स्पर्धेचेही परीक्षण त्यांनी केले आहे.
आर. के. सर महात्मा फुले मंडळाचे सक्रीय सदस्य असून मार्कंडेय शिक्षण संस्थेचे सहसंस्थापक आहेत. तत्कालीन एस. पी. बर्मनसाहेबांनी त्यांच्या कलेवर प्रभावित होऊन आपल्या सौभाग्यवतींना ही कला शिकवण्यासाठी पाचारण केले होते. शिवाय वेळोवेळी कॅन्टोन्मेंट शाळेत रेखाटलेल्या रांगोळय़ांचे भरभरून कौतुक त्या त्या वेळच्या अनेक ब्रिगेडियर साहेबांनीदेखील केले आहे. त्यांनी बनविलेल्या रायगडाच्या पायऱया उतरतानाचे छत्रपती शिवरायांच्या पोस्टरचे कलासक्तांकडून विशेष कौतुक झाले. डीटीसी (ड्राईंग टिचर कोर्स) करताना त्यांना कोल्हापूरचे रविंद्र मेस्त्री यांचे मोलाचे मार्गदर्शन मिळाले.
मार्कंडेय शिक्षण संस्थेच्या चॅरिटीसाठी केलेल्या ‘वाहतो ही दुर्वाची जुडी’ या नाटकातदेखील त्यांनी महत्वाची भूमिका केली होती. आज 81 व्या वर्षात पदार्पण केले असून त्यांना दीर्घायुरारोग्य लाभो, हीच प्रार्थना!
– मधु पाटील









