येत्या सोमवारपासून येथे खेळविल्या जाणाऱया अमेरिकन ग्रँडस्लॅम टेनिस स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविण्यासाठी पात्र फेरीच्या स्पर्धेत प्रज्नेश गुणेश्वरनच्या पराभवामुळे भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
गेल्या वर्षी या स्पर्धेत प्रज्नेशने पुरुष ऐकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये स्थान मिळविले होते. पण यावेळी त्याला पात्र फेरी पार करता आली नाही. पात्र फेरीतील पहिल्याच सामन्यात अमेरिकेच्या युबँक्सने तासभराच्या कालावधीत प्रज्नेशचा 6-3, 6-4 असा पराभव केला. त्याचप्रमाणे भारताच्या सुमित नागलला आणि रामकुमार रामनाथनला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले. अर्जेंटिनाच्या फिकोव्हिचने नागलचा 7-5, 4-6, 6-3 तर रशियाच्या डॉनस्कॉयने रामकुमार रामनाथनचा 6-4, 6-7(1-7), 6-4 असा पराभव केला. महिला विभागात भारताच्या अंकिता रैनाचे आव्हान पहिल्याच फेरीत अमेरिकेच्या जेमी लोयेबने 6-3, 2-6, 6-4 असे संपुष्टात आणले. आता या स्पर्धेत यावर्षी पुरुष आणि महिला एकेरीच्या प्रमुख ड्रॉमध्ये भारताचा एकही स्पर्धक दिसणार नाही.









