गढूळ पाण्याची बाटली दिली पालिकेला भेट, रवी ढोणे यांची सुहास राजेशिर्के यांच्यावर टीका
प्रतिनिधी/ सातारा
शहराच्या पश्चिम भागातल्या गढूळ पाण्याने बुधवारीही संतप्त झालेल्या नगरविकास आघाडीच्या माजी नगरसेवकांनी पालिकेत गढूळ पाण्याची बाटली पालिकेच्या अभियंत्यांना भेट दिली. त्यांनी पाणी प्रश्नावर जोरदार प्रश्नाची सरबत्ती करत अभियत्यांना जाब विचारला. दरम्यान, पालिकेच्या गेटवर बोंब मारो आंदोलन करत दि. 5 पर्यंत पाणी आले नाही तर प्रशासनाला दि. 6 रोजी काळे फासू असा इशारा दिला. दरम्यान, रवी ढोणे, राजू गोरे यांनी मीडियाशी बोलताना माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचे नाव न घेता त्यांच्यावर जोरदार टीका केली.
सातारा पालिकेत नविआच्यावतीने अचानक पाण्याच्या प्रश्नावर आंदोलन करण्यात आले. त्यामध्ये नविआचे माजी उपनगराध्यक्ष अमोल मोहिते, अविनाश कदम, रवी ढोणे, सामाजिक कार्यकर्ते राजू गोरे, माजी नगरसेविका हेमांगी जोशी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते. त्यांनी गढूळ पाण्याच्या बाटल्याच आणून मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांच्या टेबलवर ठेवत त्यांना पाण्याच्या प्रश्नावरुन प्रश्नांची सरबत्ती केली. काहीही करा पण लोकांना पाणी द्या. वेळेत आणि पुरेल एवढे मुबलक स्वच्छ पाणी द्या, अशी विनंती केली. त्यावर मुख्य अभियंता दिलीप चिद्रे यांनी दोन दिवसांत पाण्याचा प्रश्न निकाली काढण्यात येणार आहे, असे आश्वासन दिले.
अन् बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले
तेथून बाहेर पडताना गेटवर मीडियाशी संवाद साधल्यानंतर राजू गोरे यांनी आवाहन करताच लगेच सगळय़ा नविआच्या माजी नगरसेवकांसह पदाधिकाऱयांनी आणि कार्यकर्त्यांनी पालिकेला जाग आणण्यासाठी बोंबाबोंब आंदोलन केले. यावेळी बोलताना अविनाश कदम म्हणाले, साताऱयाच्या पश्चिम भागात दूषित पाणी पुरवठा म्हणजे गाळसदृष्य पाणी येत आहे. हे गेली 22 दिवस सुरु आहे. आज उद्या सुधारणा होईल असे सांगितले जात होते. पण अद्यापही सुधारणा झालेली नाही. त्याच्या उपर कहर म्हणजे गेली तीन दिवस पाणीच टाक्यातून भरत नाहीत. हाच प्रशासनाचा भोंगळ कारभार आहे. काही भागात दोन वेळा पाणी आहे तर काही भागात पाणीच नाही अशी दयनिय अवस्था करुन टाकली आहे. आम्हाला आता प्रशासनाने सांगितले की जे वॉटर बेड असतात फिल्टरेशनचे ते साफ करायचे म्हणून त्यांना विचारले असता गेली दहा वर्षापूर्वी हे फिल्टर बेड साफ केले होते. मग मागच्या पाच वर्षात सत्ताधाऱयांनी काय केले. प्रशासनाने आता दोन वर्ष काय केले आहे. सातारच्या नागरिकांच्या आरोग्याशी खेळण्याचा हा दरिद्री प्रयत्न चाललेला आहे. त्याचा आम्ही सगळे निषेध करतो. आज रवी ढोणे आहेत, लीना गोरे आहेत, त्यांच्याच वॉर्डात प्रॉब्लेम आहे. पश्चिम भागाला वंचित ठेवण्याचा घाणेरडा प्रकार सुरु आहे. त्यामुळे आम्ही पालिकेला अल्टीमेटम दिला आहे. सगळय़ांना स्वच्छ, निर्मळ पाणी दि. 4 पर्यंत आले नाही. दि. 6 तारखेला प्रशासनाला काळे फासण्यात येईल. त्यात आम्ही कोणीही कमी पडणार नाही. आंदोलनाची वेळ प्रशासनाने आणून देऊ नये अशी आमची प्रांजळ नम्र विनंती त्यांना आहे, असे त्यांनी सांगितले.
राजू गोरे म्हणाले, गढूळ पाण्याबाबत माझी पहिली तक्रार पालिकेत 31 तारखेला केलेली आहे. 31 तारखेपासून आज 27 दिवस झाले. आमच्या नागरिकांनी स्वतः जावून टाक्या धुण्याचा प्रयत्न केला. हे पाणी गढूळ नसून केमिकल मिक्स होते की काय हे पालिकेला कळत नाही महिना झाले. या दूषित पाण्यापासून पोटाचे विकार आहेत अंघोळ केली तर डोक्यावरील केस जात आहेत. गेल्या दोन दिवसांपूर्वी आमच्याच वॉर्डात सातारा विकास आघाडीच्या काहींनी स्टंटबाजी केली. काहीजण म्हणाले सीओना अंघोळ घालेन. आम्ही आज पाणी पुरवठा विभागात चौकशी केली तर ज्या तारखेपासून आजपर्यंत पाणी खराब येत आहे. तिथे त्यांच्या नावावर एकही टँकर बुक नाही. त्यांनी कुठल्या नागरिकांना पाणी दिले. केवळ दाखवण्यासाठी व्हिडीओ शुटींग करत आहेत. त्यांच्यासारखी स्टंटबाजी नविआ करत नाही तर नविआ रस्त्यावर उतरुन काम करते, अशी टीका सुहास राजेशिर्के यांच्यावर केली.
रवी ढोणे म्हणाले, काल सातारा विकास आघाडीचे एक माजी नगरसेवक बाटल्या घेऊन फिरत होते. त्यांनी दुसऱयाच्या वॉर्डात स्टंटबाजी करु नये. तुमची स्टंटबाजी तुमच्या वॉर्डापुरतीच करावी. लोकांच्या कल्याणासाठी तुमच्या वॉर्डात काम करा. इतरांच्या वॉर्डात डोकावून बघू नका, अशी त्यांनी माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के यांचे नाव न घेता टिका केली.








