प्रतिनिधी / विटा :
विटा शहरातील पाणी टंचाई लक्षात घेऊन माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी जलसिंचन विभाग आणि पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्यकडे पाठपुरावा करून ताकारीचे पाणी सोडावयाची विनंती केली होती. पालकमंत्र्यानी याबाबत त्वरीत आदेश देऊन पाणी सोडले आहे. पाणी तलावात येणारच आहे, हे समजल्यावर नेहमीप्रमाणे काही लोक उगाचच तलावाची पाहणी केल्याचा फार्स करीत आहेत, अशी टीका करीत विट्याशी देणेघेणे नसलेल्या राजकारण्यांच्या फुस लावण्याला बळी पडु नये, असे आवाहन माजी नगराध्यक्ष वैभव पाटील यांनी केले आहे.
याबाबत माजी नगराध्यक्ष पाटील यांनी म्हंटले आहे, गेल्या काही दिवसांपासुन घोगांव आणि आळसंद जलशुद्धीकरण केंद्राच्या परिसरात वारंवार वीजपुरवठा खंडीत होत आहे. पाईपलाईनची गळती, ताकारी जलसिंचन योजनेचे आवर्तन लांबल्याने कोरडा पडलेला आळसंद तलाव, उन्हाळ्यामुळे शहराची वाढलेली पाणी मागणी आणि विस्तारलेले शहर या एकत्रित गोष्टींचा परिणाम म्हणुन शहरवासियांना पाणीटंचाईला सामोरे जावे लागले आहे. उन्हाळ्याच्या पार्श्वभुमीवर घोगांव आणि आळसंद येथील शेतीपंपांच्या वाढलेल्या वापरामुळे त्या ठिकाणचा वीज पुरवठा वारंवार खंडित होत आहे. माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी उर्जामंत्री आणि महावितरणच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोलुन वीजेची अडचण सोडवून घेतली आहे. नगरपरिषद कर्मचाऱ्यांनी रात्रीचा दिवस करुन पाईपलाईनची देखभाल दुरुस्ती करुन घेतली आहे. त्याचबरोबर माजी आमदार सदाशिवराव पाटील यांनी जलसिंचन विभाग आणि पालकमंत्री जयंतराव पाटील यांच्यकडे पाठपुरावा करून ताकारीचे पाणी सोडावयाची विनंती केली होती.
पालकमंत्र्यानी याबाबत त्वरीत आदेश देऊन पाणी सोडले आहे. हे पाणी चार दिवसांत आळसंद तलावापर्यंत येत आहे. पाणी तलावात येणारच आहे, हे समजल्यावर नेहमीप्रमाणे काही लोक उगाचच तलावाची पाहणी केल्याचा फार्स करीत आहेत. परंतु हे नेहमीच आहे, त्यामुळे त्यास फारसे महत्व देण्याची आवश्यकता नाही. नगरपरिषदेच्या सुधारीत पाणी योजनेचे आणि बफर स्टाॅक टाक्यांचे काम गतीने पुर्ण करण्याचा प्रयत्न सुरु आहे. अडचणी मार्गी लागण्याच्या नजिक आहेत. अशा वेळी विटेकर म्हणुन संयम न सोडतां आणि कोणाच्यातरी तरी राजकिय भावनेपोटी केलेल्या वक्तव्याला आणि दिखाव्याला महत्व न देता नगरपरीषद प्रशासनास साथ द्या. पाणीपुरवठा योजनेचा वार्षिक वीज बिलासह एकूण खर्च सुमारे ४ कोटी ८० लाख रुपये होतो. शहरातील पाणीपट्टी आकारणी केवळ ३ कोटी रुपयांच्या आसपास होते. जवळपास एक कोटी रुपयाची तुट सोसुन नगरपरीषद पाणी योजना चालवीते.शहरवासीयांनी संयम बाळगावा आणि विट्याशी देणेघेणे नसलेल्या राजकारण्यांच्या फुस लावण्याला बळी पडु नये, असे आवाहन माजी नगराध्यक्ष पाटील यांनी केले आहे.








