प्रतिनिधी/ सातारा
आजपर्यंत आमच्या खटाव-माण तालुक्यांच्या भाळी दुष्काळी तालुके हाच शिक्का आहे. हा शिक्का मुजवण्याठी तालुक्यातील शेती बारमाही ओलिताखाली आणण्यासाठी हक्काचे पाणी मिळवण्यासाटी खटाव-माण शेती पाणी लढा समन्वय समिती नेमण्यात आली आहे. या समितीच्या माध्यमातून मे महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात दहिवडीत पाणी परिषद घेवून सरकारवर दबाव आणून हक्काचे पाणी मिळण्यासाठी आवाज उठवण्यात येणार आहे, अशी माहिती समितीच्यावतीने डॉ. दिलीपराव येळगावकर, धैर्यशील कदम यांच्यासह मान्यवरांनी पत्रकार परिषदेत दिली. दरम्यान, आजपर्यंत खटाव-माणवर पाणी वाटपात अन्याय झाला आहे. समन्यायी पाणी वाटप केले नाही. फेर पाणी वाटपातही अन्याय केला आहे, असा आरोप डॉ. येळगावकरांनी केला आहे.
हॉटेल प्रिती येथे खटाव-माण शेती पाणी लढा समन्वय समितीची बैठक पार पडली. त्यानंतर घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत माहिती देताना ते बोलत होते. यावेळी शिवसेनेचे धैर्यशील कदम, शेतकरी संघटनेचे संजय भगत, अनिल पवार यांच्यासह खटाव-माणमधील कार्यकर्ते व पदाधिकारी उपस्थित होते. यावेळी बोलताना धैर्यशील कदम म्हणाले, खटाव-माण तालुक्याच्या पाणी प्रश्नासाठी समिती गठीत करण्यात आली असून त्या समितीच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिलीपराव येळगावकर यांची निवड करण्यात आली आहे. समितीची ही दुसरी बैठक असून या बैठकीत काही निर्णय घेण्यात आल्याचे त्यांनी सांगितले. डॉ.येळगावकर म्हणाले, आम्ही कॉमन विषय घेऊन ही बैठक घेतली आहे. या कृष्णा पाणी लवाद 2 नुसार सर्वोच्च न्यायालयातील स्थगिती उठवण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने प्रयत्न करणे गरजेचे आहे. ती स्थगिती उठल्यास त्यातून 84 टीएमसी पाणी महाराष्ट्राच्या वाटय़ाला मिळेल. सोळशी धरणाचे काम झाल्यास खटाव-माण तालुक्यातील शेतीला पाणी मिळेल. उरमोडी धरणातून बंदिस्त पाईप लाईन होवून त्याद्वारे पाणी देण्यात यावे, जिहे कटापूर योजना आठमाही केली पाहिजे. माण तालुक्यातील पूर्व आणि उत्तरमधील 48 गावे आणि खटवची सातेवाडी, पेडगाव, एनकुळ, कणसेवाडीपर्यंत 16 गावे आणि नेर उत्तरेकडील डिस्कळ मांजरवाडी परिसरातील वंचित गावांचा समावेश करण्यात यावा. उत्तरेकडील डिस्कळ, मांजरवाडी परिसरातील वंचित गावांचा समावेश करण्यात यावा, औंध ब्रम्हपूरीसह वंचित 21 गावांचा समावेश करुन ही पाणी योजना करण्यासाठी प्रयत्न करणे, टेभू योजनेच्या फेरवाटपामध्ये 5 टीएमसी पाणी ज्यादा मिळावे. त्यामध्ये कलेढोण, गारळेवाडीसह 16 गावे, माण तालुक्यातील पूर्व भागातील गारुडी, तरसवाडीसह शेनवडी, विरळीसह 18 गावांचा समावेश करण्यात यावा, तारळी उपसा सिंचन 5.84 टीएमसीची असून 0.84 टीएमसी पाणी सांगली जिह्यासाठी आहे. त्यासाठी बंदिस्त पाईपलाईन तारळी योजनेपासून आरफळ कालव्यापर्यंत झाले आहे. त्यामुळे तारळीचे पाणी खटाव-माणला देणार कसे?, त्याची वितरण व्यवस्था करणार कशी. खटाव माणमध्ये तारळी, टेंभू आणि उरमोडीचे पाणी सिंचनासाठी येत आहे. योजनेतील या सिंचन योजनेचे हक्काचे पाणी आणण्यासाठी सांगली जिल्हाच्या धर्तीवर शेतकऱयांकडून पैसे न घेता साखर कारखानदारांकडून प्रतिटन 50 रुपये आकारणी करुन वीज देयके भरण्याची व्यवस्था करणे आदीवर चर्चा झाल्याचे त्यांनी सांगितले. दरम्यान, पाणी वाटपात खटाव-माणवर अन्याय झाल्याचे त्यांनी प्रकर्षाने सांगितले.









