नागरिकांनी आंदोलनाचा इशारा देताच कार्यवाहीला प्रारंभ
प्रतिनिधी /बेळगाव
कोनवाळ गल्ली परिसरात पाणीपुरवठा व्यवस्थित होत नाही. तसेच दूषित पाण्याचा पुरवठा होत असल्याची तक्रार तातत्याने करण्यात येत आहे. सुरळीत पाणीपुरवठा करण्यात यावा, अन्यथा आंदोलन छेडण्याचा इशारा देताच जलवाहिनी दुरुस्तीसाठी उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत. या समस्येचे निवारण करण्यासाठी एल ऍण्ड टी कंपनीने पावले उचलली आहेत.
कोनवाळ गल्ली परिसरात अपुरा पाणीपुरवठा करण्यात येत असून, मुबलक पाणी मिळत नाही. तसेच पाणी उच्चदाबाने येत नसल्याने नागरिकांनी घरासमोर खड्डे खोदले आहेत. खड्डय़ामध्ये उतरून नळाचे पाणी भरावे लागते. काही ठिकाणी दूषित पाण्याचा पुरवठा होत आहे. याबाबत महापालिका आणि पाणीपुरवठा मंडळाकडे मागील दोन वर्षापासून निवेदन देण्यात आले होते. पण याची दखल घेण्यात आली नाही. एल ऍण्ड टी कंपनीकडे तक्रार केल्यानंतर तात्पुरती दुरुस्ती करण्यात आली होती. तरीदेखील पाणी समस्येचे निवारण झाले नाही. त्यामुळे पाणीपुरवठा सुरळीत करा, अन्यथा आंदोलन छेडू, असा इशारा दिला होता. तसेच आंदोलन छेडण्यासाठी बैठक आयोजित केल्याची माहिती मिळताच एल ऍण्ड टी कंपनीच्या अधिकाऱयांनी कोनवाळ गल्लीत पाहणी करून पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी थोडा अवधी द्यावा, अशी विनंती केली होती. त्यामुळे नागरिकांनी आपले आंदोलन तूर्त स्थगित ठेवण्याचा निर्णय घेतला होता. अखेर पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी कंपनीने पावले उचलली असून, दुरुस्तीचे काम हाती घेतले आहे. परिसरात सुरळीत आणि मुबलक पाणीपुरवठय़ासाठी प्रयत्न सुरू असल्याची माहिती अधिकाऱयांनी दिली.









