लॉकडाऊनमध्ये घराबाहेर पडता येत नाही. आहार, निद्रा, भय, मैथुन आणि सोशल मीडियात बहुतेकांचे दिवस आणि रात्री चाललेल्या आहेत. अशा वेळी माणसाला विचित्र स्वप्ने पडू शकतात. आमचा मित्र हरिदास पाणीपुरीचा भोक्ता आहे. पाणीपुरी, भेळ, मिसळ हे आणि असे पदार्थ घरी खाण्यात मजा नसते. तूर्त हे पदार्थ रस्त्यावर उभे राहून खाणे अशक्मय आहे. एके दिवशी टीव्हीवर परप्रांतीय लोक निघून गेल्याच्या बातम्या बघता बघता हरिदासला झोप लागली. त्याला स्वप्नात दिसले की चौकातला भैय्या गावी निघून गेला आहे आणि त्याच्या जागेवर मराठी माणसाने पाणीपुरीची गाडी लावली आहे. तो गाडीसमोर उभा होता. पाणीपुरीवाल्याने गाडीच्या एका बाजूला कॅलेंडर लावले होते आणि दुसऱया बाजूला मोठा फलक होता. कॅलेंडरच्या अनेक चौकोनांवर फुल्या होत्या. हरिदासने त्या फुल्यांचा अर्थ विचारला.
“ज्या तारखेला एखादा सण किंवा जयंती किंवा पुण्यतिथी असेल त्या तारखेला आपण गाडी लावणार नाही. त्या दिवशी सुट्टी. शेवटी आपली संस्कृती नावाची काही गोष्ट आहे की नाही?’’
“पण त्या दिवशी आम्हाला पाणीपुरी खायची इच्छा झाली तर काय करायचं?’’ हरिदासने रडवेल्या आवाजात प्रश्न केला.
“काय राव? चेहऱयावरून आणि कपडय़ांवरून चांगले जंटलमन दिसता. तुम्हाला तुमचं घरदार आहे ना? आमची सुट्टी असेल त्या दिवशी तुम्ही घरात बसायचं. बायकोच्या हातची पोळीभाजी खायची. घरचं जेवण हीच आरोग्याची गुरुकिल्ली. काय समजलेत? आणि हो. कार्पोरेशनची इलेक्शन असेल त्या वेळी महिनाभर गाडी लावणार नाही. आमच्या अमुकभाऊंनी ही गाडी घेऊन दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी जावं लागेल.’’
निमूटपणे मान डोलावत हरिदास गाडीच्या दुसऱया बाजूला गेला आणि फलकावरचा मजकूर वाचू लागला.
प्रसन्न पाणीपुरी केंद्र
प्रो. प्रा. फलाणे
(अमुकभाऊ यांच्या सौजन्याने)
आज रोख उद्या उधार. उधार प्रेमाची कैची आहे. दोघात एक प्लेट मिळणार नाही. एका प्लेटमध्ये पाच पुऱया मिळतील. पाणी तिखट, मध्यम, गोड कसे हवे ते आगाऊ सांगावे. मागाहून तक्रार चालणार नाही. पाणीपुरी खाताना आवाज करू नये.
पाणीपुरी खाऊन झाल्यावर मोफतची सुखी-मसाला पुरी मागू नये.
कामाशिवाय जास्त वेळ उभे राहू नये.
आमची कोठेही शाखा नाही.