पाणीपुरवठा सुरळीत नसल्याने पाणीबिलात कपात करण्याची मागणी
प्रतिनिधी /बेळगाव
शहरवासियांना पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येत आहे. मात्र गेल्या सहा महिन्यांपासून पाणीपुरवठय़ात सातत्याने व्यत्यय निर्माण होत आहे. महिन्यात केवळ चार ते पाच दिवस पाणीपुरवठा करून संपूर्ण महिन्याचे पाणीबिल आकारण्यात येत आहे. त्यामुळे पाणी बिलदेखील कपात करण्यात यावे, अशी मागणी जोर धरू लागली आहे.
जुलै महिन्यापासून शहरात पाणीपुरवठय़ाची जबाबदारी एलऍण्डटी कंपनीकडे सोपविली आहे. तेव्हापासून पाणीपुरवठय़ाचे नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे. जलाशयामध्ये मुबलक पाणीसाठा असतानादेखील पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. पावसाळय़ात पूरपरिस्थिती निर्माण झाल्याने शहरवासियांना पंधरा दिवस पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यात आला नाही. गणेशोत्सवादरम्यान दुरुस्तीचे काम निघाल्याने पंधरा दिवस पाणीपुरवठा ठप्प होता. त्यानंतर दसरा-दिवाळी सणादरम्यान पाणीपुरवठा करणाऱया कर्मचाऱयांनी आंदोलन छेडल्याने पाणीपुरवठा ठप्प झाला होता. परिणामी शहरवासियांना पंधरा दिवसांनंतर पाणीपुरवठा करण्यात आला. पुन्हा दुरुस्तीच्या कारणास्तव दहा दिवसांपासून पाणीपुरवठा करण्यात आला नसल्याने पाणीटंचाई निर्माण झाली आहे. अलीकडे चोवीसतास पाणीपुरवठा योजनेलादेखील फटका बसला असून पाण्यासाठी भटकंती करण्याची वेळ आली आहे.
प्रत्येक महिन्याला पाणीबिल देण्यात येते. दर महिन्याला 175 रुपये पाणीबिल भरणा नागरिकांना करावा लागतो. पण तीन दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात येते. मात्र, प्रत्यक्षात दहा ते बारा दिवसाआड पाणीपुरवठा केला जात आहे. मार्च महिन्यात पाच दिवसाआड पाणीपुरवठा करण्यात येत असल्याचे सांगण्यात आले. पण महिन्याभरात केवळ तीन ते चार दिवस पाणीपुरवठा करण्यात आला. ते देखील केवळ एका दिवशी एकच तास पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे पाणीपुरवठा न करताच नागरिकांना संपूर्ण महिन्याचे पाणीबिल भरावे लागत आहे.
महिन्यातील दहा दिवस पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता
पाणीपुरवठय़ात कपात करण्यात आले, त्याप्रमाणेच पाणीबिलात कपात करणार का? असा मुद्दा माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी उपस्थित केला. सोमवारी महापालिका कार्यालयात आयुक्तांनी बोलाविलेल्या एलऍण्डटी कंपनीच्या अधिकाऱयांच्या बैठकीत पाणीबिलाचा मुद्दा उपस्थित करण्यात आला. महिन्यात दहा दिवस पाणीपुरवठा करण्याची आवश्यकता आहे. त्यामुळे पाणीबिलात कपात करण्याची मागणी माजी नगरसेवक डॉ. दिनेश नाशीपुडी यांनी केली आहे.









