प्रतिनिधी/ बेळगाव
चोवीस तास पाणीपुरवठा योजनेचा विस्तार संपूर्ण शहरात करण्यासाठी ‘एल ऍण्ड टी’ कंपनीकडून सर्वेक्षण करण्यात येत आहे. शहरातील पाणीपुरवठा करण्याची सर्व जबाबदारी ‘एल ऍण्ड टी’ कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. दि. 15 डिसेंबरपासून शहरातील पाणीपुरवठय़ाचे कामकाज ‘एल ऍण्ड टी’ कंपनी पाहणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे.
सध्या शहराच्या दहा वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा करण्यात येतो. उर्वरित 48 वॉर्डांमध्ये 24 तास पाणीपुरवठा योजनेचे विस्तारीकरण करण्याचे काम हाती घेण्यात आले आहे. सदर काम ‘एल ऍण्ड टी’ कंपनीकडे सोपविण्यात आले आहे. सध्या घरोघरी जाऊन ग्राहकांकडून माहिती घेण्यात येत आहे. सर्वेक्षणाचे काम पूर्ण झाल्यानंतर 24 तास पाणीपुरवठा करण्यासाठी जलवाहिन्या घालण्यासह जलकुंभ उभारणी करणे आदी विविध कामे सुरू करण्यात येणार आहेत. त्याकरिता सध्या सुरू असलेल्या पाणीपुरवठय़ाचे नियोजन ‘एल ऍण्ड टी’ कंपनीकडे सोपविणे गरजेचे आहे. ‘एल ऍण्ड टी’ कंपनीने 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम पूर्ण केल्यानंतर पुढील कालावधीसाठी देखभाल करण्याची जबाबदारी देखील कंपनीची असणार आहे.
24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम सुरू करण्याच्या दृष्टीने पावले उचलण्यात आली आहेत. सध्या शहरातील पाणीपुरवठय़ाचे नियोजन पाणीपुरवठा मंडळाकडून करण्यात येते. पण योजनेच्या कामास प्रारंभ झाल्यानंतर पाणीपुरवठा नियोजनाची जबाबदारी ‘एल ऍण्ड टी’ कंपनीकडे सोपविण्यात येणार आहे. दि. 15 डिसेंबर पासून पाणीपुरवठा मंडळाचा सर्व कारभार ‘एल ऍण्ड टी’ कंपनीकडे हस्तांतर करण्यात येणार आहे. सध्या पाणीपुरवठा मंडळाकडून करण्यात येणारे सर्व कामकाज ‘एल ऍण्ड टी’ कंपनीला पहावे लागणार आहे. तसेच विविध भागात यापूर्वी 24 तास पाणीपुरवठय़ासाठी जलवाहिन्या घालण्यात आल्या आहेत. त्या भागातील उर्वरित जलवाहिन्या घालण्याचे काम पूर्ण करून नळ जोडणी करण्यात येणार असल्याची माहिती उपलब्ध झाली आहे. त्यामुळे मागील 5 वर्षांपासून रखडलेले 24 तास पाणीपुरवठा योजनेचे काम लवकरच मार्गी लागणार आहे.









