कामांच्या पूर्ततेसाठी दीपक केसरकरनी दिली आठ दिवसांची मुदत : अधिकाऱयांवर नाराजी
वार्ताहर / दोडामार्ग:
मागील वर्षी पाणीटंचाई आढावा सभेत सुचविलेली कामे पूर्ण झाली नाहीत. त्यामुळे संबंधित सर्व कामे येत्या आठ सुरु करा अन्यथा संबंधित विभागाच्या अधिकारी, कर्मचाऱयांवर कारवाईचे पत्र काढू, अशी तंबी माजी पालकमंत्री तथा आमदार दीपक केसरकर यांनी दिली.
महालक्ष्मी सभागृहात आमदार केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली संभाव्य पाणीटंचाई निवारण कृती आराखडा बैठक झाली. यावेळी व्यासपीठावर केसरकर, जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर, जि. प. सदस्या संपदा देसाई, पं. स. सभापती संजना कोरगावकर, उपसभापती धनश्री गवस, पं. स. सदस्य बाबुराव धुरी, लक्ष्मण नाईक, सुनंदा धर्णे, प्रभारी तहसीलदार एन. एन. देसाई, गटविकास अधिकारी मिलिंद जाधव, ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे उपअभियंता रमेश मठकर व विभागांचे खातेप्रमुख उपस्थित होते.
केसरकर म्हणाले, दोडामार्ग तालुक्यासाठी पाणीटंचाईच्या कामांसाठी निधी मंजूर झाला आहे. मात्र अधिकारी हलगर्जीपणा करतात. गतवर्षी तिलारी नदीला आलेल्या पुरामुळे अनेक गावांतील पाणीपुरवठा करणाऱया यंत्रणा खराब झाल्या. अनेक ठिकाणी पुरामुळे मोठय़ा प्रमाणात नुकसान झाले. या नुकसानीबाबत जलसंपदा मंत्र्यांकडे पाठपुरावा करून निधी उपलब्ध करू, असे आश्वासन केसरकर यांनी दिले. तसेच या संदर्भात येत्या दहा ते बारा दिवसांत पुन्हा सभा घेतली जाईल, असेही त्यांनी सांगितले आहे. या बैठकीला तालुक्यातील अनेक सरपंच व ग्रामसेवक उपस्थित होते.
जिल्हा परिषदेतील कामे पूर्ण करून देऊ – राजेंद्र म्हापसेकर
बैठकीमध्ये तालुक्यातील सरपंचांनी खंत व्यक्त केली. पंचायत समितीमध्ये गेल्यावर तुमचे काम जिल्हा परिषद स्तरावर रखडले आहे, तर जिल्हा परिषदेत गेल्यावर अद्याप ते पंचायत समिती स्तरावर आहे, अशी उत्तरे प्रशासकीय अधिकाऱयांकडून देण्यात येतात, असे सरपंच सूर्यनारायण गवस यांनी सांगितले. त्यावर जि. प. उपाध्यक्ष राजेंद्र म्हापसेकर यांनी पंचायत समितीच्या गटविकास अधिकारी यांना आपल्याकडील असलेले प्रस्ताव तात्काळ पूर्ण करून जिल्हा परिषदकडे पाठवा. जिल्हा परिषद स्तरावर पाठपुरावा करून प्रकरणे निकाली काढू, असे आश्वासन दिले.
ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंत्यांची बोलती बंद
पाणीटंचाई निवारण बैठकीत तालुक्यातील ग्रामपंचायतींचा पाणीटंचाई संदर्भातील अहवाल घेतले. प्रत्येक सरपंच व ग्रामसेवकाने आपण प्रस्ताव सादर केल्याचे सांगितले. मात्र दोन वर्षे होऊनही अद्याप कामांची पूर्तता होत नाही, अशी खंत व्यक्त केली. यावेळी ग्रामीण पाणीपुरवठा उपअभियंता रमेश मठकर यांना याबाबत आमदार केसरकर यांनी जाब विचारला असता त्यांच्याकडे काही उत्तरच नव्हते. त्यांनी आपल्या विभागाच्यावतीने दिलगिरी व्यक्त केली.
तालुक्यातील एकमेव काम पूर्ण
गतवर्षी झालेल्या पाणीटंचाई निवारण बैठकीत कुंब्रल या गावातील नळपाणी योजना दुरुस्ती काम सुचविले होते. ते काम सततच्या पाठपुराव्या खनिकर्म योजनेतून मार्गी लागले आहे. सध्या गावात या योजनेद्वारे पाणीपुरवठा केला जात आहे, असे सरपंच प्रवीण परब यांनी सांगितले.









