आमदार सुदिन ढवळीकरांची माहिती : युवा वर्गाला देणार अधिक प्राधान्य : विधानसभेच्या सर्व जागार लढविणार
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील सर्व 40 मतदारसंघात मगो पक्षाची पाडव्याच्या शुभमुहुर्तावर पुनर्बांधणी करण्यात येणार असून तेथे युवावर्गाला प्राधान्य दिले जाणार आहे. विधानसभेच्या सर्व 40 जागा मगो लढणार आहे. जिल्हा पंचायतींच्या 17 जागा पक्ष लढणार असून 2 जागांवर अपक्षांना पाठिंबा देणार आहे. कोरोनाचे संकट कायम असल्याने दिवाळीतील नरकासुर स्पर्धा आणि नवीन वर्ष स्वागताचा सनबर्न महोत्सव रद्द करण्याची मागणी मगो पक्षाने केली आहे.
मगो पक्षाचे ज्येष्ठ नेते आणि माजी उपमुख्यमंत्री सुदिन ढवळीकर यांनी पणजीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. यावेळी त्यांनी काँग्रेस आणि भाजप या दोन्ही पक्षांवर हल्लाबोल केला.
तरुणांना देणार पक्षाची उमेदवारी
ते म्हणाले की, मगो पक्षाने अध्यक्ष दीपक ढवळीकर यांच्या नेतृत्वाखाली एक समिती स्थापन केली असून ती गावोगावी तसेच सर्व मतदारसंघात फिरणार आहे. नवे आणि ताज्या दमाचे तरुण चेहरे शोधून त्यांना मगो पक्षातर्फे विधानसभेत उमेदवारी दिली जाणार आहे. पक्षाचे कामही प्रत्येक मतदारसंघात वाढावे म्हणून प्रयत्न करण्यात येणार आहेत.
मगोची राजवटच सरस
गोमंतकीय जनतेने मगो पक्षाची राजवट यापूर्वी पाहिली आहे तसेच आजच्या पिढीने काँग्रेस, भाजप या दोन्ही पक्षांचा कारभारही अनुभवला आहे. तिन्ही राजवटीची तुलना केली तर मगोची राजवटच सरस आणि चांगली होती, असा दावा ढवळीकर यांनी करून तशी राजवट पुन्हा गोव्यात यावी म्हणून जनतेने सहकार्य करावे, असे आवाहन केले.
केळसा, रेल्वे दुपदरीकरण हे प्रकल्प काँग्रेसचे
कोळसा आणि रेल्वे दुपदरीकरण हे दोन्ही प्रकल्प काँग्रेसचे असून भाजपाने ते अंमलात आणले आहेत. त्यांना जनतेचा मोठा विरोध होत असून मगो पक्ष जनतेसोबत आहे, अशी ग्वाही ढवळीकर यांनी दिली.
संजीवनी बंद केला तर भाजप हद्दपार
संजीवनी साखर कारखाना बंद केला तर भाजपाला गोव्यातून जावे लागेल, असा इशारा देऊन ढवळीकर यांनी सांगितले की, भाजप सरकार अनेक आश्वासने देते, घोषणा करते परंतु प्रत्यक्षात मात्र काहीच होत नाही, मग आत्मनिर्भर भारत स्वयंपूर्ण गोवा कसा होणार? असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
विविध योजनांचे पैसे लाभार्थींना मिळत नाहीत
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी नोकऱया देतो म्हणून आकडे सांगितले. पण अजून त्या नोकऱयांचा पत्ता नाही. अनेक योजनांचे पैसे लाभार्थ्यांना मिळत नाहीत. त्यांचे अर्जही मोठय़ा संख्येने प्रलंबित आहेत.
मंत्र्यांमध्ये नाही समन्वय
मंत्र्यांमध्ये समन्वय नाही. एक मंत्री आयआयटीला विरोध करतो तर दुसरा पाठिंबा देतो. जनतेच्या विरोधाला हे सरकार किंमत देत नाही. आणि ते प्रकल्प नको असताना लादू पाहत आहेत. मग आत्मनिर्भर भारत-स्वयंपूर्ण गोवा कसा होणार हे मुख्यमंत्री डॉ. सावंत यांनीच सांगावे, असे ढवळीकर यांनी नमूद केले.
सध्याच्या 19 आमदारांचा वेगळा गट
मगो पक्षाला ज्यांनी दगा दिला त्यांना बाजूला ठेऊन युवावर्गाला जास्तीत जास्त संधी देऊन मगो पक्ष वाढवण्यावर भर देण्यात येणार आहे. फुटीर 12 आमदार आणि इतर काही आमदार मिळून 19 जणांचा एक वेगळा गट झाल्याचा गौप्यस्फोट त्यांनी केला.









