नवीन साहित्य खरेदीला उधाण, पूजेच्या साहित्याची रेलचेल

बेळगाव : अंधाराकडून प्रकाशाकडे घेऊन जाणाऱया दिवाळी सणाला उत्साहात प्रारंभ झाला आहे. शुक्रवारी होणाऱया पाडक्याच्या पूर्वसंध्येला बाजारात खरेदीसाठी तोबा गर्दी झाली होती. साडेतीन मुहूर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या मुहूर्तासाठी अनेकांनी सोने, नवीन वाहने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे व इतर साहित्य खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी केली होती.
दिवाळी हा दीपोत्सवाचा सण असल्याने विविध प्रकारच्या पणत्या, दिवे, मेणबत्त्या, कंदील यासह विशेषतः पूजेच्या साहित्यांनी गुरुवारी बाजारपेठ सजली होती.
बाजारात झेंडूच्या फुलांची मोठय़ा प्रमाणात आवक झाली आहे. याबरोबर कापूर, नारळ, अगरबत्ती, बत्ताशा, आंबोती, केळीची पाने, ऊस यासह फुले, हार व झेंडूच्या फुलांना विशेष मागणी होती. दैनंदिन साहित्यांच्या खरेदीपेक्षा गुरुवारी पूजेच्या साहित्याचीच खरेदी मोठय़ा प्रमाणात झाली.
गणपती गल्ली, मारूती गल्लीत प्रचंड गर्दी
बाजारपेठेतील गणपत गल्ली, मारूती गल्ली, पांगुळ गल्ली, खडेबाजार, रामदेव गल्ली, किर्लोस्कर रोड, समादेवी गल्ली, हंस टॉकीज रोड, भेंडीबाजार आदी परिसरात नागरिकांची वर्दळ वाढली होती. तर गणपती गल्ली व मारूती गल्लीत खरेदीसाठी प्रचंड प्रमाणात गर्दी झाली होती. त्यामुळे वाहतूक कोंडीही झाली आहे. या कोंडीतून बाहेर पडताना नागरिकांना कसरत करावी लागली.
पाडव्याच्या मुहुर्तावर विविध वस्तूंच्या खरेदीला उधाण
साडेतीन मुहुर्तापैकी एक असलेल्या पाडव्याच्या खरेदीसाठी बाजारात गर्दी झाली होती. विशेष करून सोने, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू, कपडे, वाहनांच्या खरेदीला ऊत आला होता. बाजारात सोने, इलेक्ट्रॉनिक्स व कपडय़ांच्या दुकानात नागरिकांची वर्दळ पहायला मिळाली.
फळांची मागणी
शहरासह ग्रामीण भागात गुरुवारी दुकान व्यापाऱयांनी लक्ष्मी पूजन केले. त्यामुळे विशेषतः पूजेसाठी लागणाऱया विविध फळांची मागणी वाढली होती. 100 ते 120 रुपये दराने पाच फळांची विक्री सुरू होती.
बाजारपेठेत केळीची, उसाची विक्री
रविवारपेठेत गुरुवारी मोठय़ा प्रमाणात विक्रीसाठी ऊस, केळीची व आंब्याच्या पानाची आवक वाढली होती. लक्ष्मी पूजेसाठी लागणाऱया ऊस, केळी व आंब्याच्या पानाची मोठय़ा प्रमाणात विक्री झाली. दोन केळीचे मोने 100 रुपये तर पाच ऊस 80 रुपये दराने विक्री झाले.
बाजारात गर्दी… रस्त्यावर कोंडी
दिवाळीच्या खरेदीसाठी आलेल्या नागरिकांमुळे बाजारातपेठेत गुरुवारी गर्दी उसळली. त्यामुळे नागरिकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागले. या वाहतूक कोंडीतून मार्ग काढताना वाहनधारक व नागरिकांची दमछाक झाली. गणपत गल्ली, खडेबाजार, मारूती गल्ली, कडोलकर गल्ली, पांगुळ गल्ली, समादेवी गल्ली, काकतीवेस रोडवर खरेदीसाठी गर्दी झाली होती. त्यामुळे बाजारात आलेल्या नागरिकांना हातातील साहित्य सांभाळत गर्दीतून मार्ग काढावा लागला. त्याबरोबरच काही ठिकाणी वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.









