प्रतिनिधी /बेळगाव
पाठय़पुस्तकांचा अभाव असून सर्व अडचणींचा सामना करत कोरोना काळात कर्नाटकातील 62 टक्के विद्यार्थ्यांनी हाती असलेल्या पुस्तकांच्या आधारे अभ्यास पूर्ण केला आहे. ऑनलाईनपेक्षा पुस्तकांच्या आधारे अभ्यास करणाऱया विद्यार्थ्यांची संख्या अधिक आहे. 44 टक्के मुलांनी ब्रॉडकास्ट तर 34 टक्के मुलांनी ऑनलाईनच्या माध्यमातून अभ्यास केला.
शिक्षण खात्याने नुकत्याच प्रसिद्ध केलेल्या वार्षिक अहवालामधून ही माहिती नमूद करण्यात आली आहे. राज्यात खासगी शाळांतील 41 टक्के मुलांनी व सरकारी शाळांतील 32 टक्के मुलांनी ऑनलाईनद्वारे अभ्यास केला. ऑनलाईनद्वारे अभ्यासक्रम करण्यामध्ये केरळ प्रथम क्रमांकावर आहे.
सप्टेंबर-ऑक्टोबरमध्ये सर्वेक्षण करण्यात आले, तेव्हा 82 टक्के विद्यार्थ्यांकडे त्यांच्या इयत्तेनुसार पाठय़पुस्तके होती. दुर्दैवाने अन्य राज्यांच्या तुलनेत हे प्रमाण कमी आहे. प. बंगालमध्ये 98 टक्के तर केरळमध्ये 97 टक्के मुलांकडे पुस्तके होती. मात्र कर्नाटक पाठय़पुस्तक समितीचे अध्यक्ष मादेगौडा यांच्या मते शिक्षण खात्याने 100 टक्के पुस्तके वितरित केली होती.
विद्यार्थ्यांनी चंदन वाहिनीवरून प्रसारित होणाऱया अभ्यासक्रमाचा लाभ घेतला. हे प्रमाण 44 टक्के आहे. मात्र स्मार्ट फोन वापरण्याचे प्रमाण वाढले तरी रेंज मिळण्यामध्ये अडचणी होत्या. राज्यात 72 टक्के विद्यार्थी स्मार्ट फोन वापरत होते. त्यापैकी 36 टक्के विद्यार्थ्यांना अडचण आली नाही. तर 53 टक्के विद्यार्थ्यांना अडथळे निर्माण झाले. तर 12 टक्के विद्यार्थ्यांना रेंजच मिळू शकली नाही. शिक्षकांनी घरी जावून शिकवावे, असे सरकारने जाहीर केले होते. मात्र, केवळ 28 टक्के शिक्षकांनी त्याचे पालन केले.