मगोसंदर्भात भाजपच्या नाराज आमदारांची भूमिका : विषय मिटल्याचा मुख्यमंत्री डॉ. सावंत यांचा दावा
प्रतिनिधी /पणजी
मगो पक्ष व त्यांचे नेते सुदिन ढवळीकर यांचा पाठिंबा घेण्यावरून तसेच त्यांना मंत्रिपद देण्यावरून भाजप आमदारांमध्ये नाराजी नाटय़ सुरू झाले असून त्यांनी मगो पक्षाच्या व ढवळीकरांचा पाठिंबा तसेच त्यांना मंत्रिपद देण्यास तीव्र विरोध दर्शविला आहे. दरम्यान, हा विषय मिटला असून सर्व भाजप आमदार समाधानी झाल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केल्याचे सांगण्यात आले.
या संदर्भात भाजपच्या काही आमदारांनी वेगळी बैठक घेऊन या विषयावर चर्चा केली. मगोसह ढवळीकरांच्या पाठिंब्यास व त्यांना मंत्रिपद देण्यास विरोध करण्याचे ठरविले. संबंधित असंतुष्ट आमदारांनी हा विरोध मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या कानावर घातला असून मगोचा पाठिंबा घेऊ नये व ढवळीकरांना मंत्रिपद देऊ नये, अशी मागणी त्यांच्याकडे केली आहे. त्यामुळे मगो पक्षावरून भाजप आमदारांत धुसफूस सुरू झाल्याचे समोर आले आहे. मात्र हा विषय मिटला असून सर्व भाजप आमदार समाधानी झाल्याचा दावा डॉ. सावंत यांनी केल्याचे सांगण्यात आले.
पाठिंबा घेऊ नका, मंत्रीपद देऊ नका
भाजपचे आमदार रवी नाईक, गोविंद गावडे, सुभाष शिरोडकर, नीलेश काब्राल, जोशुआ डिसोझा, बाबूश मोन्सेरात व अन्य काही आमदारांनी भाजपची विधिमंडळ गटाची बैठक झाल्यानंतर पणजीतील एका हॉटेलात स्वतंत्र बैठक घेतली. त्यात मगो पक्षाला अर्थात ढवळीकरांना विरोध करण्याचा निर्णय घेण्यात आला. भाजपकडे वीस आमदार असताना आणि 3 अपक्षांचा पाठिंबा मिळाल्याने मगो पक्षाच्या पाठिंब्याची भाजपला गरज नाही. ढवळीकरांना मंत्रिपद दिल्यास भाजपचा एक आमदार मंत्रिपदापासून वंचित राहतो. यासाठी त्यांना मंत्रिपद देणे चुकीचे आहे, असेही असंतुष्ट आमदारांनी डॉ. सावंत यांना सांगितले आहे.
संभाव्य मंत्रिमंडळात सुभाष शिरोडकर, गोविंद गावडे. नीलेश काब्राल, जोशुआ डिसोझा यांना स्थान नसल्यामुळे ते संतापले आहेत. मंत्रिपदावरून भाजप आमदारांची घुसमट सुरू असल्याचे चित्र दिसून येत आहे.
“मगोसंदर्भातील विषय मिटला आहे. सर्व भाजप आमदार समाधानी झाले आहेत’’.
डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री









