बेळगाव : पाटील गल्ली परिसरातील गटारीवर फरशा घालण्यात आल्याने गटारी स्वच्छतेकडे महापालिकेने दुर्लक्ष केले आहे. येथील रहिवाशांच्या आंदोलनानंतर महापालिकेला जाग आली असून गटारींवरील फरशा हटवून स्वच्छता मोहीम हाती घेतली आहे. मात्र गटारीवरील हटविलेले बांधकाम साहित्य रस्त्यावर विखुरले असल्याने रहदारीस अडथळा होत आहे. त्यामुळे हे साहित्य कधी हटविणार? असा प्रश्न उपस्थित करण्यात येत आहे. कपिलेश्वर उड्डाणपुलाच्या शेजारील गटारीचे बांधकाम करण्यात आले नसल्याने सांडपाण्याचा निचरा होत नाही. परिणामी पाटील गल्ली परिसरातील गटारींमध्ये सांडपाणी साचून राहत आहे. परिणामी परिसरात अस्वच्छता निर्माण झाली आहे. तसेच विहिरींचे पाणी दूषित होत आहे. गटारी स्वच्छ करण्यासाठी महापालिकेकडे अनेकवेळा तक्रारी केल्या. मात्र याची दखल घेण्यात आली नाही. त्यामुळे पाटील गल्लीतील रहिवाशांना आंदोलनाचे अस्त्र उगारावे लागले. परिसरातील रहिवाशांनी शनिवारी रास्तारोको करून गटार स्वच्छता करण्याची मागणी केली. याची दखल घेऊन महापालिकेच्या आरोग्य विभागाने गटारीवरील फरशा व सिमेंट काँक्रीट हटवून गटारी स्वच्छ करण्याचे काम सुरू केले आहे.
गेल्या दोन दिवसापासून हे काम सुरू आहे.
मात्र गटारीवरील फोडण्यात आलेले काँक्रीट व काढण्यात आलेल्या फरशा आणि बांधकाम साहित्य पाटील गल्ली रस्त्यावर विखुरले आहे. फोडण्यात आलेले बांधकाम साहित्य हटविण्याची आवश्यकता आहे. पण याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याने रहदारीस अडथळा ठरत आहे. रात्रीच्यावेळी वाहनधारकांना धोका निर्माण झाला आहे. गटारी स्वच्छ झाल्या, पण रस्त्यावरील अडथळे स्वच्छ करण्याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाले आहे. त्यामुळे रस्त्यावरील साहित्य कधी हटविणार? अशी विचारणा नागरिक करीत आहेत. फरशांव्यतिरिक्त टाकावू बांधकाम साहित्य हटवून रस्ता मोकळा करावा, अशी मागणी नागरिक करीत आहे.









