56 तोळे सोने लगडीच्या स्वरुपात सापडले, सोने वितळविण्याची मशिनही ताब्यात : आठ घरफोडय़ांची कबुली : चोरीसाठी राहत होता भाडय़ाने : कर्नाटकात भोगली होती शिक्षा
प्रतिनिधी / सावंतवाडी:
महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोवा राज्यात दिवसाढवळय़ा घरफोडय़ा करणाऱया सराईत टोळीचा मुख्य सूत्रधार प्रकाश पाटील आणि त्याच्या साथीदारांवर सिंधुदुर्ग, कर्नाटक, गोवा राज्यात 70 गुन्हे दाखल आहेत. सिंधुदुर्ग पोलिसांनी दोडामार्ग-मणेरी येथे शिताफीने पाटीलच्या मुसक्या आवळल्यानंतर त्याच्याकडून तब्बल 56 तोळे सोने, पिस्तुल, चार काडतुसे, सोने वितळविण्याची मशिन व लगड बनविण्याचा साचा, बजाज पल्सर मोटरसायकल, घरफोडी करण्यासाठी लागणारे साहित्य हस्तगत केले आहे. सावंतवाडी, कुडाळ येथे झालेल्या घरफोडय़ांची पाटील याने कबुली दिली आहे. अलिकडेच सावंतवाडीत दिवसाढवळय़ा झालेल्या दोन चोऱयाही याच टोळीने केल्याचे उघड झाले आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक दीक्षितकुमार गेडाम यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने ही कारवाई केली. गेडाम यांनी शनिवारी पत्रकार परिषद घेऊन या कारवाईची माहिती दिली.
जिल्हय़ात अलिकडच्या काळात कुडाळ, सावंतवाडीत घरफोडय़ा झाल्या. दिवसाढवळय़ा घरफोडय़ा होत असल्याने नागरिकांत भीती होती. सावंतवाडीत खासकीलवाडा येथे भरत गवस यांच्या बंगल्यात आणि गरड येथील आनंद देसाई यांच्या फ्लॅटमध्ये सकाळी साडेअकराच्या सुमारास घरफोडी झाली. त्यामुळे पोलिसांच्या कार्यक्षमतेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते. या घटनांची दखल जिल्हा पोलीस अधीक्षक गेडाम यांनी घेऊन स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाला सतर्क केले. गुन्हा अन्वेषणचे उपअधीक्षक साहू देसाई, निरीक्षक प्रल्हाद पाटील, उपनिरीक्षक सचिन शेळके, पोलीस कर्मचारी सुभाष खंदारे, सुधीर सावंत, आशिष गंगावणे, गुरुनाथ कोयंडे, अनुपकुमार खंडे, अनिल धुरी, कृष्णा केसरकर, प्रवीण वालावलकर, सत्या पाटील, रवी इंगळे, ज्ञानेश्वर कांदळगावकर, अमित तेली,
श्रीमती व्ही. एस. कुलकर्णी आदींनी घरफोडी करणाऱया टोळीचा मागोवा घेण्यास सुरुवात केली. सावंतवाडीचे निरीक्षक सुनील धनावडे यांनीही त्यासाठी सहकार्य केले.
तपासणी करतांना सापडला
दोडामार्ग-सावंतवाडी मार्गावर मणेरी येथे जठार देवस्थानजवळ पोलीस कॉस्टेबल सत्या पाटील, रवी इंगळे हे संशयित वाहनांची 29 जानेवारीला तपासणी करत असताना सायंकाळी साडेचारच्या सुमारास एक काळय़ा-निळय़ा रंगाची पल्सर घेऊन दोन व्यक्ती आल्या. त्यांना तपासणीसाठी हात दाखविला असता मागे बसलेली व्यक्ती पळून गेली. त्यामुळे मोटारसायकल चालकाची तपासणी केली असता त्याच्याजवळ पिस्तुल व चार जिवंत काडतुसे आढळली. त्याच्याजवळ असलेल्या बॅगमध्ये घरफोडीसाठी वापरण्यात येणाऱया दोन कटावण्या, दोन स्क्रू ड्रायव्हर, हॅण्ड ग्लोव्हज, मास्क, टोपी, पाना व 500 रुपये आढळले. त्याला पकडून कसून चौकशी सुरू झाली. त्यात प्रकाश पाटील हा सराईत गुन्हेगार असल्याचे निष्पन्न झाले. त्याच्यावर महाराष्ट्र, कर्नाटक व गोवा राज्यात 70 गुन्हे दाखल असल्याचे उघडकीस आले. त्याने 2009 मध्ये दोडामार्ग आणि कुडाळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत घरफोडय़ा केल्या. त्यानुसार त्याच्यावर हत्यार अधिनियमानुसार गुन्हा दाखल करण्यात आले. त्याला न्यायालयात हजर केले असता तीन
फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडीत ठेवण्याचे आदेश देण्यात आले. स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाने पाटील याची झाडाझडती घेतली. त्यात सावंतवाडी, बांदा भागातील आठ घरफोडय़ांची कबुली दिली.
भाडय़ाने वास्तव्य
प्रकाश पाटील व त्याच्या साथीदारांनी सिंधुदुर्गात घरफोडय़ा करण्यासाठी दोडामार्गात भाडय़ाने खोली घेतली होती. तेथूनच ते घरफोडय़ांची आखणी करत असत. कुणाला संशय येऊ नये, यासाठी त्यांनी दोडामार्गसारख्या भागात भाडय़ाने खोली घेतली. तेथून ते महाराष्ट्र, कर्नाटक आणि गोव्यात घरफोडय़ा करत. ते एका राज्यातून दुसऱया राज्यात जात असत. त्यादृष्टीने त्यांना दोडामार्ग हे मोक्याचे ठिकाण मिळाले होते. तिन्ही राज्यात या ठिकाणाहून सहज जाता येत होते.
टेहळणी करून घरफोडय़ा
प्रकाश पाटील व त्याचे साथीदार सराईत चोरटे आहेत. दिवसाढवळय़ा घरफोडय़ा करण्यात ते माहीर आहेत. ते टेहळणी करून घरफोडी करत. घरफोडय़ा करून त्यांनी अनेकांचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लंपास केली होती. त्यापैकी 56 तोळे सोने हस्तगत करण्यात पोलिसांना यश आले.
सोने वितळविण्याचे मशिन सापडले
पाटील व त्याचे साथीदार घरफोडय़ा करून लंपास केलेले सोन्याचे दागिने सोन्याच्या इलेक्ट्रॉनिक भट्टीत वितळवत असत. इलेक्ट्रॉनिक भट्टीच्या साच्यावर ते सोन्याची लगड बनवित असत. इलेक्ट्रॉनिक भट्टी, इलेक्ट्रॉनिक भट्टीचे साचे, सोन्याच्या लगडी बनविण्याचा साचाही पोलिसांनी हस्तगत केला. त्याशिवाय घरफोडी करण्याची हत्यारे, इलेक्ट्रॉनिक वजनकाटा, चिमटा, साचे, 50 हजार रुपये किंमतीचे पिस्तुल, 13 लाख रुपये किमतीच्या सोन्याच्या लगडी मिळून 14 लाख 50 हजार रुपये किंमतीचा मुद्देमाल हस्तगत केला.
हस्तगत सोने 22 लाखांचे
पोलीस अधीक्षक गेडाम यांनी सांगितले की, प्रकाश पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. त्याच्यावर तीन राज्यात 70 गुन्हे दाखल आहेत. त्याच्याकडून 13 लाख रुपयांचे सोने हस्तगत केले असून त्याची आजच्या बाजारभावाने किंमत 22 लाख रुपये आहे. त्याशिवाय पिस्तुल, चार काडतुसे, सोने वितळविण्याची मशिन हस्तगत करण्यात आली आहे. पाटील याचे आणखी साथीदार असून त्यांचाही शोध घेण्यात येत आहे. पाटील याने कुठे-कुठे घरफोडय़ा केल्या? त्याने दागिने कुठे विकले? भाडय़ाने खोली दिलेल्या घरमालकाने पाटील याची माहिती पोलिसांना दिली होती काय, याची पोलीस कसून चौकशी करणार आहेत.
विशेष पथकाची कारवाई
घरफोडय़ा करणाऱया टोळीला पकडणे आव्हान होते. मात्र, स्थानिक गुन्हा अन्वेषण विभागाचे निरीक्षक प्रल्हाद पाटील यांनी विशेष पथक स्थापन करत घरफोडय़ा करणाऱयांची माहिती मिळवत ही कारवाई केली. अप्पर पोलीस अधीक्षक तुषार पाटील, पोलीस उपअधीक्षक शिवाजी मुळीक यांच्या मार्गदर्शनाखाली ही कारवाई करण्यात आली. त्यामुळे आता अनेक घरफोडय़ा उघडकीस येणार आहेत, असे गेडाम यांनी सांगितले. यावेळी उपअधीक्षक संजय मुळीक, निरीक्षक प्रल्हाद पाटील, निरीक्षक सुनील धनावडे, उपनिरीक्षक सचिन शेळके उपस्थित होते.
सीसीटीव्हीत दिसलेल्या दुचाकीवरून तपास
सावंतवाडी शहरात एकाच दिवशी तीन ठिकाणी घरफोडी झाली होती. या चोरीच्या गुन्हय़ाचा तपास करताना पोलिसांनी शहर व परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱयाचे फुटेज पाहिले. त्यातून दुचाकीने आलेल्या चोरटय़ांचा शोध लागला. दुचाकीच्या नंबरवरून त्या चोरटय़ापर्यंत पोहोचून त्याला गजाआड करण्यात पोलीस यंत्रणेला यश आले. सदरची दुचाकी प्रकाश पाटील याच्या नावे आहे.
कर्नाटकात भोगली शिक्षा
संशयित प्रकाश पाटील हा सराईत गुन्हेगार आहे. कर्नाटक राज्यातील घरफोडी प्रकरणी तेथील कारागृहात त्याने शिक्षा भोगली होती. मार्च 2019 मध्ये तो कारागृहातून शिक्षा भोगून बाहेर पडला होता. त्यानंतर त्याने पुन्हा एकदा कारनामे दाखवले. आतापर्यंत तो व त्याच्या सहकाऱयांनी जिल्हय़ात आठ ठिकाणी घरफोडी केल्याचे उघड झाले आहे.









