प्रतिनिधी / बेळगाव
शहरातील गळत्या निवारणाबाबत सातत्याने तक्रार करूनही पाणीपुरवठा मंडळाचे दुर्लक्ष झाले आहे. पाटील गल्ली येथील रस्त्याच्या मध्यभागी जलवाहिनीला गळती लागली असून, गेल्या कित्येक महिन्यापासून पाणी वाहत आहे. दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असल्याने दुरूस्तीबाबत पाणीपुरवठा आणि मनपाच्या अधिकाऱयांना कधी जाग येणार? असा मुद्दा उपस्थित करण्यात येत आहे.
शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार असल्याने पाणीपुरवठा मंडळाने गळत्या निवारणाकडे दुर्लक्ष केले आहे. परिणामी शहरातील विविध गळत्यांद्वारे दररोज हजारो लिटर पाणी वाया जात आहे. गळत्यांचे निवारण करण्यात यावे अशी मागणी करून महापालिकेला आणि पाणीपुरवठा मंडळाला अनेकवेळा निवेदने देण्यात आली होती. पण याची दखल घेतली नाही. प्रत्येक गल्लीतील जलवाहिनीला गळती लागली आहे. भुमिगत विद्युतवाहिन्या घालताना अनेक ठिकाणी जलवाहिन्या फुटून लहान मोठय़ा गळत्या लागल्या आहेत. जलवाहिन्यांच्या गळत्याद्वारे पाणी वाया जावूनही याची दुरूस्ती करण्याबाबत पाणीपुरवठा मंडळाने दुर्लक्ष केले आहे. त्यामुळेच पाटीलगल्ली येथील गळतीद्वारे वाहणारे पाणी गटारीमधून वाहत आहे. एकीकडे पाणीपुरवठा सुरळीत केला जात नसल्याने पाणी टंचाई समस्या भेडसावत असते. तर दुसरीकडे पाणीपुरवठा मंडळाच्या दुर्लक्षामुळे पिण्याचे शुद्ध पाणी गळतीद्वारे गटारीत वाहत आहे. पाणीपुरवठा मंडळाच्या गैरकारभाराबद्दल नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
पाटीलगल्ली येथील उड्डाणपुलाजवळ लागलेल्या गळतीद्वारे सातत्याने पाणी जाऊन रस्ता खराब झाला आहे. पण गळती निवारणाची तसदी पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी घेतली नाही. शहरात 24 तास पाणीपुरवठा योजना राबविण्यात येणार आहे. याकरिता सर्व्हेक्षणाचे काम सुरू करण्यात आले असून, लवकरच या कामाला सुरूवात करण्यात येणार आहे. त्यामुळे पाणीपुरवठा मंडळाच्या अधिकाऱयांनी जलवाहिन्या दुरूस्त करण्याकडे दुर्लक्ष केले आहे. पण याचा फटका नागरिकांना बसत आहे. गळत्या लागलेल्या जलवाहिन्यांमध्ये सांडपाणी मिसळून नागरीकांच्या नळांना दुषित पाणी येत आहे. त्यामुळे सोडण्यात येणारे पाणी प्रारंभी दुषित येत आहे. शहरातील सर्रास भागात दुषित पाणीपुरवठा होत असल्याने नागरिकांचे आरोग्य धोक्मयात आले आहे. पाटीलगल्लीतील जलवाहिनीच्या दुरूस्तीसह शहरातील गळत्यांचे निवारण करावे अशी मागणी होत आहे.









