शिवसेना उपजिल्हासंघटक गोपाळ गवस यांचा आरोप
झाडी काढा अन्यथा आंदोलन
घोटगेवाडी-मोर्ले-केर-भेकुर्ली या गावांना सात किमीचा फेरा
प्रतिनिधी / दोडामार्ग:
घोटगेवाडी-मोर्ले-केर-भेकुर्ली या गावांना जोडणारा शॉर्टकट मार्ग गेल्या पाच दिवसांपासून पाण्याखाली आहे. त्या ठिकाणच्या पुलाला लागलेली झाडी काढल्यास मार्ग निर्धोक होईल. पण, त्याकडे पाटबंधारे खाते दुर्लक्ष करीत आहे. परिणामी हा मार्ग धोकादायक झाला आहे. शिवाय दोन किलोमीटर अंतरासाठी तब्बल सात किलोमीटर अधिक अंतर पार करावे लागत आहे. त्यामुळे धोका पत्करून वाहनचालक घोटगेवाडी येथील पुलावरून वाहने हाकत आहेत. पाटबंधारे खात्याच्या अधिकाऱयाना संपर्क करून ते याकामी दुर्लक्ष करीत असल्याचा आरोप शिवसेना उपजिल्हा संघटक गोपाळ गवस यांनी करीत दुर्घटना घडल्यास सदर विभाग जबाबदार असेल, असे सांगितले. शिवाय सदर विभागाच्या वेळकाढू धोरणाबाबत आंदोलन करण्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.









