शहरातील घरफोडय़ांच्या तपासाला मिळणार दिशा
चिपळूण
दोन आठवडय़ांपूर्वी शहरातील परशुरामनगरासह परिसरात झालेल्या घरफोडीदरम्यान अज्ञात चोरटय़ांनी चोरलेल्या दोन दुचाकी पाटण व कराड येथे सापडल्या आहेत. या दुचाकी चिपळूण पोलीस ताब्यात घेणार असून तपासाला दिशा देण्यास त्या महत्त्वाच्या ठरणार आहेत.
चोरटय़ांनी शहरातील परशुरामनगर परिसरातील सात सद्निका, तर एक बंगला फोडल्याची घटना 17 रोजी मध्यरात्री घडली होती. यातूनच रोख रक्कम व सोने-चांदीसह 53 हजार रुपयांचा ऐवज चोरटय़ांनी लांबवला होता. याच चोरीदरम्यान चोरटय़ांनी आयस्मार्ट व युनिकॉन या दोन दुचाकीही चोरुन नेल्या होत्या. दुचाकी चोरतेवळी चोरटे सीसीटिव्ही फुटेजमध्ये कैद झाले आहेत. दुचाकी चोरीस गेल्याचा प्रकार उघडकीस आल्यानंतर दुचाकी मालकांनी पोलीस स्थानकात याबाबतची फिर्याद दिली असून त्यानुसार अज्ञात चोरटय़ांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांकडून चोरीसत्राचा तपास सुरु असतानाच त्यावेळी चोरलेल्या दोन दुचाकींचा शोध लागला असून यातील आयस्मार्ट ही दुचाकी कराड तर युनिकॉन दुचाकी पाटण येथे सापडली आहे. चिपळूण पोलीस या दोन्ही दुचाकी ताब्यात घेणार असून शहरात झालेल्या या घटनेचा तपास उलघडण्यासाठी त्या महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.









