वृत्तसंस्था/ बेंगळूर
येथे सुरू असलेल्या आठव्या प्रो कबड्डी लिग स्पर्धेतील रविवारी झालेल्या 59 व्या सामन्यात पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सचा 38-31 अशा गुणांनी पराभव केला. या स्पर्धेतील दुसऱया एका अटीतटीच्या सामन्यात तामिळ थलैवाजने जयपूर पिंक पँथर्सला 31-31 असे बरोबरीत रोखले.
पाटणा पायरेट्स आणि बेंगळूर बुल्स यांच्यातील सामन्यात पाटणा पायरेट्स संघाच्या बचावफळीची कामगिरी अत्यंत दर्जेदार झाली. पाटणा पायरेट्स संघाच्या बचावफळीतील सुनीलने 9 गुण तर एस. मोहम्मदरजाने 3 गुण घेतले. बेंगळूर बुल्सचा स्टार खेळाडू पवन सेहरावतला पाटणा पायरेट्सची बचावफळी भेदता आली नाही. सामन्याच्या मध्यंतरापर्यंत पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सवर 20-16 अशी आघाडी मिळविली होती. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना पाटणा पायरेट्सने बेंगळूर बुल्सवर 11 गुणांची आघाडी मिळविली होती. शेवटच्या क्षणी पवन सेहरावत आणि दीपक नरवाल यांच्या आक्रमक चढायांमुळे पाटणा पायरेट्सची आघाडी कमी झाली. अखेर पाटणा पायरेट्सने हा सामना 38-31 अशा सात गुणांच्या फरकाने जिंकला.
तामिळ थलैवाज आणि जयपूर पिंक पँथर्स या दोन्ही संघांचा खेळ दर्जेदार आणि आक्रमक झाला. तामिळ संघाचा कर्णधार सूरजित सिंग आणि जयपूर पिंक पँथर्सचा कर्णधार संदीप धूल यांनी आपल्या चढायांमध्ये अधिक गुण वसूल केले. मध्यंतरापर्यंत जयपूर पिंक पँथर्सने तामिळ थलैवाजवर 17-13 अशी आघाडी घेतली होती. सामना संपण्यास दहा मिनिटे बाकी असताना दोन्ही संघ 24-24 असे बरोबरीत होते. शेवटच्या सत्रामध्ये उभय संघांनी आघाडी घेण्याचा प्रयत्न केला. पण अखेर ही लढत 31-31 अशी बरोबरीत राहिली.









