ऑनलाईन टीम / सातारा :
सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या संचालकपदाच्या निवडणुकीत पाटण सोसायटी मतदारसंघातील प्रतिष्ठेच्या लढतीत राष्ट्रवादीचे नेते सत्यजितसिंह पाटणकर यांनी बाजी मारली असून, गृहराज्यमंत्री (ग्रामीण) शंभूराज देसाई यांना 7 मतांनी पराभव पत्करावा लागला.
या मतदासंघात 103 मतदान होते. त्यापैकी 102 मतदारांनी मतदानाचा हक्क बजवला होता. त्यामध्ये पाटणकरांना 58 तर देसाई यांना 44 मते मिळाली. देसाई यांचा पराभव शिवसेनेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान, जिल्हा बँकेच्या या निवडणुकीत सहकारमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई आणि आ. शशिकांत शिंदे यांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. यात गृहराज्यमंत्री देसाई आणि शशिकांत शिंदे यांचा पराभव झाला. तर सहकारमंत्री पाटील विजयी झाले.









