पाटगांव/प्रतिनिधी
भुदरगड तालुक्याचा पश्चिम भागात दमदार पावसाच्या हजेरीने भात रोपांची पेरणी करण्यात आली होती. आता भातपिकाच्या लावणीला सुरुवात झाली आहे. संपूर्ण कोकणामध्ये प्रामुख्याने भातपीक खरीप हंगामात घेतले जाते. सध्या तालुक्यात भातपिकाच्या लावणीला वेग आला आहे. त्यामूळे कोरोना संसर्ग रोगाची भिती असली तरी बळीराजा मुसळधार पडणाऱ्या पावसात रोप लावण करण्यात मग्न आहे.
कडगांव पाटगांव परिसरात पिढ्यानपिढ्या चालत आलेली पध्दत वापरली जाते. यंदा रोहिणी नक्षत्रात पाऊस पडला नाही पण पावसाचे आद्रा नक्षत्रात पाऊस झाल्याने भाताची आवण (तरवा) योग्य झाल्याचे पाहून शेतकरी लावणीच्या कामाला जुंपला आहे. भातलावणी हा कोकणातील बळीराजाच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक आहे. त्यामुळे बळीराजा आपल्या कुटुंबातील लोकांसह गावातील इतर कुटुंबातील लोकांनाही भातलावणीच्या कामात सहभागी करुन घेत असतो. या पध्दतीला बदली कामगार पध्दत म्हणून ओळखले जाते. त्याचप्रमाणे शेतमजूर उपलब्ध झाल्यास २५० ते ३०० रुपये मजुरीवर भातलावणीसाठी घेण्यात येतो. सध्या बळीराजा आनंदात असून भातलावणी व नाचणा लावणी कामाची लगबग सुरू आहे.
यंदा समाधानकारक पाऊस पडला असला तरी मधूनच अवेळी पाऊस पडून पिकाची हानी करण्याचे काम दरवर्षी होत असते तरीही त्यातून उभारी घेत येथील बळीराजा शेतीच्या कामात मग्न होतो. दरवर्षी येणाऱ्या संकटाची पर्वा न करता सध्यातरी बळीराजा आपल्या लावणीच्या कामात मग्न असल्याचे चित्र पहावयास मिळत आहे. यंदा चांगले पीक हाती येईल, अशी बळीराजाला अपेक्षा आहे.
भातलावणीला भागात चिखल करण्यासाठी सध्या बैलजोडीचा वापर दुर्मिळ झाला असून या जागी पॉवर ट्रेलरचा वापर होत असल्याच शिवारात दिसुन येत आहे रोप लावणी पावसाच्या पाण्याची आवश्यकता असते. हे पाणी डोंगर माथ्यावरुन वाहळातून आलेले असते ते आपल्या अन्य शेतकरी बांधवांच्या सहाय्याने बांध फोडून जिथे भातलावणी सुरू असते तिथे आणले जाते. ही मशागत होत असताना या चिखलीतच महिला भाताची लावणी करतात.
नोकरीसाठी मुंबईसह परजिल्ह्यात जाणारा तरुण वर्ग आणि भातशेती परवडत नसल्याने कोकणातील अनेकांनी भातशेतीकडे पाठ फिरवली होती. त्यामुळे गेल्या दहा वर्षांत शेकडो हेक्टर क्षेत्र पडिक झाले होते; मात्र कोरोनामुळे मुंबईकर चाकरमानी गावी परतला आहे. हाताला काम नसल्याने त्यांनी शेतीच्या कामांना प्राधान्य दिल्याचे चित्र आहे. त्यामुळे जिल्ह्यातील पडिक क्षेत्र भाताशेतीसाठी वापरले जाण्याची शक्यता आहे.








