कोल्हापूर जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रावर कडक बंदोबस्त
प्रतिनिधी / कोल्हापूर
नॅशनल टेस्टिंग एजन्सी (एनटीए)तर्फे वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी देश पातळीवर घेण्यात येणारी नॅशनल एलिजीबिलीटी कम एन्ट्रन्स टेस्ट (नीट) परीक्षा 5 हजार विद्यार्थ्यांनी दिली. ही परीक्षा दुपारी 2 ते सायंकाळी 5 या वेळेत कोल्हापूर जिल्ह्यातील 13 परीक्षा केंद्रावर कडक पोलीस बंदोबस्तात झाली. कोरोनाच्या नियमांचे पालन करीत विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली. काही विद्यार्थ्यांना पेपर सोपा गेला तर काही विद्यार्थ्यांना पेपर अवघड गेल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
नीट परीक्षा कोल्हापुरातील केआयटी कॉलेज, भारती विद्यापीठ, डी. वाय. पाटील इंजिनिरिंग कॉलेज तळसंदे, वारणा महाविद्यालय, सायबर कॉलेज, न्यू मॉडेल हायस्कूल, संजय घोडावत इन्स्टिट्यूट, शरद इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी कॉलेज, शांतीनिकेतन हायस्कूल, ताराराणी विद्यालय, डी. वाय. पाटील इंजिनिअरिंग कॉलेज यासह 13 केंद्रावर सुरळीत पार पडली. या परीक्षेला 720 गुणांसाठी 200 प्रश्न आहेत, त्यापैकी 180 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवले. भौतिकशास्त्र, रसायनशास्त्र, प्राणीशास्त्र, वनस्पतीशास्त्र या चार विषयांसाठी ए व बी गटात विभाजन केले आहे.
ए गटामध्ये 35 प्रश्नांपैकी सर्वच प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवले. ब गटात 15 पैकी 10 प्रश्न सोडवले. असे प्रत्येक विषयाचे 45 प्रश्न विद्यार्थ्यांनी सोडवले. विद्यार्थ्यांचे आधार कार्ड, ऍडमिट कार्ड, स्वत:चा फोटो तपासूनच परीक्षा केंद्रात सोडण्यात आले. तसेच विद्यार्थ्यांनी कॉलर नसलेला साधा शर्ट आणि पँट, तर मुलींनी सलवार कुर्ता आणि साधी चप्पल घातलेली होती. मास्क, सॅनिटायझर वापरण्यास परवानगी होती. ही परीक्षा ओएमआर शीटवर घेण्यात आली. प्रत्येक वर्गात घड्याळ बसवण्यात आले होते.