ऑनलाईन टीम / नागपूर :
फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडियाच्या गोदामात जागा नसल्याने बाहेर ठेवलेल्या गहू आणि तांदळाचे मागील पाच वर्षात 25 कोटींहून अधिक किंमतीचे नुकसान झाले आहे. माहितीच्या अधिकारातून ही बाब समोर आली आहे.
माहिती अधिकार कार्यकर्ते अभय कोलारकर यांनी ‘एफसीआय’कडे याबाबतची माहिती मागवली होती. ‘एफसीआय’कडून मिळालेल्या माहितीनुसार, गोदामात धान्य साठवण्यासाठी जागा नसल्याचे सरकारने गोदामाबाहेरच गहू आणि तांदळाचा साठा केला आहे. हवामानातील बदलामुळे गोदामाबाहेरील धान्याची मोठय़ा प्रमाणात नासाडी होत आहे. उंदरांच्या प्रादुर्भावामुळे कोणतेही नुकसान झालेले नाही. 2015-16 ते जानेवारी 2020 या कालावधीत 0.216 लाख मेट्रिक टन गहू व तांदूळ खराब झाले आहेत. यामध्ये 0.098 लाख मेट्रिक टन गहू व 0.118 लाख मेट्रिक टन तांदळाचा समावेश होता. खराब झालेल्या गहू आणि तांदूळाची किंमत ही 25 कोटी 12 लाख इतकी होती. नुकसान झालेल्या गव्हाची किंमत 9 कोटी 24 लाख तर तांदळाची किंमत 15 कोटी 88 लाख एवढी आहे.








