ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :
उत्तर प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूर या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम अखेर आज केंद्रीय निवडणूक आयोगाकडून जाहीर करण्यात आला. या राज्यांमधील निवडणुका सात टप्प्यात होणार आहेत. दरम्यान, 15 जानेवारीपर्यंत रोड शो, रॅली, पदयात्रा, सायकल आणि स्कूटर रॅलीला परवानगी दिली जाणार नाही. व्हर्च्युअल रॅलीद्वारेच निवडणुकीच्या प्रचाराला परवानगी असेल. तसेच विजयानंतर कोणतीही विजयी मिरवणूक काढता येणार नाही, असे निवडणूक आयोगाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.
मुख्य निवडणूक आयुक्त सुशील चंद्र म्हणाले, 5 राज्यांच्या 690 विधानसभांच्या जागांसाठी निवडणुका होणार आहेत. 18.34 कोटी मतदार या निवडणुकीत मतदान करतील. कोरोना दरम्यान निवडणुका घेण्यासाठी नवीन प्रोटोकॉल लागू केले जातील. सर्व निवडणूक कर्मचाऱयांना कोरोना लसीचे दोन्ही डोस मिळालेले असतील. या निवडणुकीत कोरोनाबाधित देखील मतदान करू शकतील, अशा रुग्णांना पोस्टल बॅलेट सुविधा असेल. निवडणुकीसाठी 2.15 लाखांहून अधिक मतदान केंदे असतील. प्रत्येक मतदान केंद्रावर जास्तीत जास्त 1500 ते 1250 मतदार मतदान करतील.
सात टप्प्यांमध्ये होणाऱ्या या निवडणुकीसाठी पहिला टप्पा उत्तरप्रदेशातून 10 फेब्रुवारीला सुरू होईल. उत्तर प्रदेशात पहिल्या टप्प्यासाठी 14 जानेवारीला परिपत्रक काढलं जाईल. अर्ज भरण्याची तारीख 21 जानेवारी, तर अर्ज मागे घेण्याची तारीख 27 जानेवारी असेल. तर मतदान 10 फेब्रुवारीला होईल. दुसरा टप्प्यात उत्तर प्रदेशचा दुसरा टप्पा, उत्तराखंड, पंजाब आणि गोव्याचा पहिला टप्पा अशा चार राज्यांमध्ये निवडणुका होतील. 21 जानेवारीला नोटिफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख 28 जानेवारी, मागे घेण्याची मुदत 31 जानेवारी तर मतदानाची तारीख 14 फेब्रुवारी असेल.
तिसऱ्या टप्प्यात उत्तरप्रदेशात मतदान होईल. त्यासाठी 25 जानेवारीला नोटीफिकेशन, अर्ज भरण्याची तारीख 1 फेब्रुवारी, मागे घेण्याची मुदत 4 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 20 फेब्रुवारी असेल. चौथ्या टप्प्यातही उत्तर प्रदेशच्या निवडणुका होतील. नोटिफिकेशन तारीख 27 जानेवारी, अर्ज भरण्याची तारीख 3 जानेवारी, मागे घेण्याची तारीख 7 फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख 23 फेब्रुवारी असेल. पाचव्या टप्प्यात उत्तर प्रदेशचा पाचवा आणि मणिपूरचा पहिला टप्पा असेल. नोटिफिकेशन 1 फेब्रुवारीला, अर्ज भरण्याची तारीख 8 फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख 11 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 27 फेब्रुवारी असणार आहे.
सहाव्या टप्प्यात उत्तर प्रदेश सहावा आणि मणिपूरच्या दुसऱ्या टप्प्याच्या निवडणुका होतील. यात नोटिफिकेशन 4 फेब्रुवारी, अर्ज भरण्याची तारीख 11 फेब्रुवारी, मागे घेण्याची तारीख 16 फेब्रुवारी तर मतदानाची तारीख 3 मार्च असेल. सातव्या टप्प्यातही उत्तरप्रदेशच्या निवडणुका होतील. त्यासाठी 10 फेब्रुवारीला नोटिफिकेशन निघेल. अर्ज भरण्याची तारीख 17 फेब्रुवारी, अर्ज मागे घेण्याची तारीख 21 फेब्रुवारी आणि मतदानाची तारीख 7 मार्च असेल. तर 10 मार्चला सर्व राज्यांची मतमोजणी होईल.