काम करण्यास कर्मचाऱयांचा नकार व्यक्त केली वाढत्या कोरोनाची भीती
प्रतिनिधी / मडगाव
कोरोनाने गोव्यात कहर केलाय. कोरोना नियंत्रणात येण्याची कोणतीच लक्षणे दिसत नाहीत. अशा पार्श्वभूमीवर शुक्रवार दि. 23 एप्रिल रोजी होणारी पाच नगरपालिकांची निवडणूक आता लांबणीवर पडणार असल्याचे संकेत मिळू लागले आहे. आज बुधवार दि. 21 रोजी प्रचाराचा शेवटचा दिवस असून तो संपल्यानंतरच निवडणूक लांबणीवर टाकली जाणार असल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची प्रकरणे झपाटय़ाने वाढू लागली आहे. त्यात मडगाव आरोग्य केंद्रात 950, म्हापसात 501, केपेत 99, सांगे 61, वास्को 507 कोरोना रूग्ण आढले असून या पाच ठिकाणी नगरपालिकेच्या निवडणुका होत आहे. कोरोनामुळे गेल्या 24 तासांत 26 जणांचा बळी केल्याने सर्वांनीच त्याचा जबरदस्त धसका घेतला आहे. 24 तासांत कोरोनाचे 1160 रूग्ण आढळले आहे.
निवडणूक काम करण्यास कर्मचाऱयांचा नकार
या वाढत्या कोरोनामुळे सरकारी अधिकारी निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यास राजी नाहीत. अनेकांनी आपली नाराजी आपल्या वरिष्ठांना कळविली आहे. सद्या कोरोनाने कहर केला असून अशा परिस्थितीत मतदान केंद्रावर काम करणे शक्य नसल्याचे अनेक कर्मचाऱयांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे वरिष्ठ पातळीवर काल निवडणूक लांबणीवर टाकण्यासंदर्भात खलबते सुरू होती. जिल्हा पंचायत निवडणुकीच्या वेळी प्रचाराचा शेवटचा दिवस संपल्यानंतर निवडणूक लांबणीवर टाकण्याची घोषणा करण्यात आली होती. त्याच पद्धतीने आज बुधवारी प्रचाराची सांगता झाल्यानंतर निवडणूक लांबणीवर टाकल्याचा आदेश जारी होऊ शकतो अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. कोरोना नियंत्रणात आल्यानंतर पुन्हा तीन-चार दिवसात निवडणूक प्रक्रिया केली जाणार असल्याचे सांगितले जात आहे.








