राज्य निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण : मार्गदर्शक तत्वांनुसार मोहीम राबवावी
प्रतिनिधी / पणजी
निवडणुका होत असलेल्या 5 पालिका क्षेत्रात कोरोना प्रतिबंधक लसीकरण मोहीम (टीका उत्सव) आयोजित करण्यास निवडणूक आयोगाने अनुमती दिली आहे. पेंद्र सरकारच्या मार्गदर्शक तत्वानुसार ही मोहीम राबविण्यात यावी आणि राजकारण विरहित असावी, असे आयोगाने सूचित केले आहे.
लसीकरण केंद्रात कोणतीही जाहिरातबाजी नसावी, तसेच तेथे कोणत्याही प्रकारचे पक्षीय राजकारण नको. उमेदवारांनीदेखील तेथे कोणत्याही पक्षाचा गवगवा करू नये तसेच लसी दिल्या म्हणून त्याचा संबंध निवडणुकीशी, पक्षाशी अथवा उमेदवारांशी जोडण्यात येऊ नये, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.
या लसीकरण मोहिमेचा तसेच टीका उत्सवाचा वापर मतदारांना आकर्षित करण्यासाठी कोणी करू नये. त्याआधारे राजकीय पक्षांनी तसेच उमेदवारांनी मते मागू नयेत. त्यासाठी आयोग अशा लसीकरण कार्यक्रमांवर लक्ष नजर ठेवणार असून त्या संदर्भात कोणतीही पत्रके, जाहिरातबाजी, पोस्टर्सचा वापर करण्यावर बंदी घालण्यात आली आहे. दोन्ही जिल्हाधिकारी, निर्वाचन अधिकारी, पालिका अधिकारी, मुख्याधिकारी, सर्व प्रकारचे निरीक्षक आदींनी सदर टीका उत्सवावर लक्ष ठेवून वरील नियमांचा भंग झाल्याचे आढळल्यास त्वरित कळवावे. त्याची खात्री केल्यानंतरच लसीकरण कार्यक्रम रद्द केला जाणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.








