एकूण अर्जसंख्या पोहोचली 324 वर पंचायतींच्या दोन प्रभागांसाठी चार अर्ज
प्रतिनिधी / पणजी
राज्यातील पाच नगरपालिकांच्या निवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी म्हणजेच काल मंगळवारी 137 अर्ज दाखल झाले असून एकूण अर्जसंख्या 324 वर पोहोचली आहे. दोन ग्रामपंचायतींच्या एकेका प्रभागात होणाऱया पोटनिवडणुकीसाठी प्रत्येकी दोन मिळून चार अर्ज दाखल झाले आहेत.
मडगाव, मुरगाव, म्हापसा, सांगे व केपे पाच पालिकांची निवडणूक व सर्वण कारापूर आणि वेळ्ळी या ग्रामपंचायतींच्या एकेका प्रभागासाठी पोटनिवडणूक दि. 23 एप्रिल रोजी होणार आहे. त्यासाठी अर्ज दाखल करण्याची प्रक्रिया दि. 8 एप्रिलपर्यंत चालणार आहे.
दि. 31 रोजी मडगाव वगळता अन्य चार पालिकांसाठी 10 इच्छूक पुढे आले होते. दि. 1 एप्रिल रोजी आणखी 26 जणांनी अर्ज दाखल केले. त्यानंतर दि.3 एप्रिल रोजी 22 अर्ज दाखल झाले. दि. 5 एप्रिल रोजी एकाच बरोबर चक्क 129 अर्ज दाखल झाले तर काल दि. 6 रोजी त्याही पेक्षा जास्त म्हणजे तब्बल 137 जणांनी अर्ज दाखल केले. त्याद्वारे अर्जांची संख्या 324 एवढी झाली असून पालिकावार अर्जसंख्या म्हापसा 59, मडगाव 79, मुरगाव 93, केपे 62 व सांगे 31 अशी आहे.
दरम्यान, सर्वण कारापूर आणि वेळ्ळी या ग्रामपंचायतींच्या पोटनिवडणुकीसाठी अर्ज दाखल करण्याच्या पाचव्या दिवशी प्रथमच दोन्ही पंचायतींसाठी प्रत्येकी दोन अर्ज दाखल झाले आहेत.









