अचूक बातमी “तरुण भारत”ची, बुधवार, 29 सप्टेंबर 2021, सकाळी 9.00
● गत 24 तासात 208 रूग्ण वाढले
● पॉझिटिव्हीटी रेट 2.77 वर
● 7 हजार 509 संशयितांच्या चाचण्या
● रूग्णवाढ वाढूू न देण्याची हीच योग्य वेळ
● नियमांच्या कारवाईत ढिलाई
● मंगळवारी 12 हजार 41 जणांना लस
सातारा / प्रतिनिधी :
जिल्ह्यात सप्टेंबर महिन्यात कोरोना रूग्णवाढीचा वेग मंदवला आहे. गत पाच दिवसात रूग्णवाढीत कमालीची घसरण होऊन 200 ते 150 च्या खाली रूग्णवाढ आली होती. रूग्णवाढ पुन्हा उसळी घेऊ नये यासाठी वारंवार आवाहन केले जात असतानाच बुधवारी रूग्णवाढ अचानक वाढून 208 वर पोहचली. गेल्या 24 तासात 7 हजार 509 संशयितांच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यामुळे पॉझिटिव्हीटी रेट पुन्हा 2.77 वर पोहचला आहे.
रूग्णवाढ आटोक्यात रहायला हवी
गेल्या पाच दिवसात रूग्णवाढ दोनशेच्या खाली होती. 23 तारखेला 186 रूग्णांची वाढ झाली होती. 24 तारखेला 184 रूग्ण वाढून पॉझिटिव्हीटी रेट 2.11 वरच होता. 25 तारखेला सर्वात कमी 141 रूग्णांची वाढ झाली. 26 तारखेला रूग्णवाढ 148 वर होती. 27 तारखेला 150 रूग्ण तर 28 तारखेला आज 208 रूग्णांची वाढ झाली आहे. पॉझिटिव्हीटी रेटही वाढला आहे.
प्रशासनाची कारवाई थंडावली…सारेच मोकाट
जिल्ह्याने दुसरी लाट अत्यंत गंभीर स्वरूपात अनुभवली असताना यातून शहाणपण घेणे गरजेचे आहे. मात्र कोरोनाचा मंदावलेला वेग पाहता स्थानिक प्रशासनाकडूनही कारवाईकडे सोयीस्कर दुर्लक्ष झाले आहे. पहिली लाट मंदावल्यानंतर असेच वातावरण होते मात्र त्याची दाहकता दुसरी लाट वेगाने आल्यावर लक्षात आली. त्यामुळे कोरोनाची आकडेवारी आणखी कमी होऊन कायमची आटोक्यात ठेवण्यासाठी जबाबदारीचे भान बाळगणे आवश्यक आहे. प्रशासनानेही दररोज नाही पण किमान आठवड्यातून काही दिवस तरी गर्दीच्या ठिकाणी नियमांची पायमल्ली करणारांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज आहे.
मंगळवारपर्यंत जिल्हय़ात
एकूण नमूने 20,63,368
एकूण बाधित 2,48,156
एकूण कोरोनामुक्त 2,38,903
मृत्यू 6,082
उपचारार्थ रुग्ण 5,511
मंगळवारी जिल्हय़ात
बाधित 208
मुक्त 241
मृत्यू 01









