पाण्याची समस्या मिटविण्यासाठी प्रयत्न
प्रतिनिधी / बेळगाव
केंद्र सरकार, राज्य सरकार, जिल्हा पंचायत, तालुका पंचायत आणि ग्राम पंचायतच्या माध्यमातून राबविण्यात येणारी जलजीवन मिशन आता मुतगा गावात राबविण्यासाठी मोठय़ा हालचाली सुरू झाल्या आहेत. जिल्हा पंचायतचे अभियंते यांनी नुकतीच या ठिकाणी पाहणी करून आराखडा तयार केला आहे. या कामांना लवकरच चालना देण्यात येणार आहे. त्यामुळे नागरिकांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
बेळगाव तालुक्मयातील अनेक गावांमध्ये ही योजना राबविण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मात्र, मुतगा गावात ही योजना तातडीने राबविण्यासाठी हालचाली गतिमान झाल्या आहेत. या योजनेसाठी सुरुवातीला 3 कोटी मंजूर झाले होते. मात्र, त्यानंतर तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर व ग्रामस्थांनी पुढाकार घेऊन अनेक अधिकाऱयांना भेटून हा निधी 5 कोटी करून घेतला आहे. त्यामुळे आता गावातील पाणी समस्या मिटणार आहे.
तालुका पंचायतीचे कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी यांच्या प्रयत्नातून या कामांना तातडीने गती मिळाली असल्याचे सांगण्यात आले. दरम्यान, जिल्हा पंचायतीचे अभियंते महादेव चौगुले यांनी नुकतीच मुतगा गावाला भेट देऊन आराखडा तयार करण्याचे आश्वासन दिले. याचबरोबर गावात कोणत्या प्रकारे पाण्याचा स्रोत आहे किंवा कोठून पाणी आणता येईल यासाठी चर्चा करण्यात आली.
आराखडा अंतिम टप्प्यात
जिल्हा पंचायतचे अभियंते महादेव चौगुले यांची नूतन ग्राम पंचायत सदस्यांनी भेट घेऊन या कामाला तातडीने सुरुवात करा, अशी मागणी केली. यावेळी त्यांनी सध्या आराखडा तयार करण्यात येत असून लवकरच कामाला गती देण्यात येणार असल्याचे सांगितले. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त करण्यात येत आहे. यावेळी नांदुडकर, नाईक, ग्राम पंचायत सदस्य देशपांडे आणि इतर ग्रामस्थही उपस्थित होते.
दरम्यान, ग्राम पंचायत अध्यक्ष भालचंद्र पाटील, तालुका पंचायत सदस्य सुनील अष्टेकर याचबरोबर ग्राम पंचायत सदस्य शाम मुतगेकर, किरण पाटील, संजय पाटील, अजित पुजारी यांनी चौगुले यांना ज्या भागात अजूनही पाण्याची समस्या आहे तेथेही नवीन पाईपलाईन व इतर सोयीसुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करा, असे सांगितले. यावेळी वॉटरमन शिवाजी कडेमनी व इतर उपस्थित होते.
सर्वच गावांमध्ये योजना राबवणार…

जलजीवन मिशन योजना ही आता तालुक्मयात सर्वच गावांमध्ये राबविण्यात येणार आहे. त्यासाठी सरकारकडून आदेश आले आहेत. मात्र, पहिल्या टप्प्यात 79 गावांची निवड करण्यात आली आहे. या जलजीवन मिशनअंतर्गत प्रत्येक व्यक्तीला दिवसाला 55 लिटर पाणी देण्यात येणार आहे. अजूनही दुसऱया टप्प्यातील गावांची नावे अथवा आकडेवारी आली नाही. त्यामुळे येत्या वर्षभरात ही कामे पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असणार आहेत. – ता.पं.कार्यकारी अधिकारी मल्लिकार्जुन कलादगी









