दोघांना अटक : शिरसी तालुक्यातील मराठीकोप्प येथे कारवाई
प्रतिनिधी / कारवार
बहुमूल्य औषधी आणि सुगंधी पदार्थ तयार करण्यासाठी वापरण्यात येणारे आणि देशात विक्रीवर निर्बंध असलेले सुमारे पाच कोटी रुपये किमतीचे साडेपाच किलो अंबरग्रीस जप्त करून चोरटय़ा वाहतुकीसाठी प्रयत्नशील असलेल्या दोन व्यक्तींना ताब्यात घेण्यात आले. ही कारवाई सोमवारी मध्यरात्री शिरसी तालुक्यातील मराठीकोप्प येथे करण्यात आली. अंबरग्रीसच्या वाहतुकीसाठी वापरण्यात येणारी महाराष्ट्र नोंदणीकृत मारुती स्वीफ्ट (एमएच 04, डीबी 3713) जप्त करण्यात आली आहे. देवमाशाच्या उलटीला अंबरग्रीस म्हणून ओळखले जाते. ताब्यात घेण्यात आलेल्या व्यक्तींची नावे संतोष भालचंद्र कामत (वय 43, मूळचा रा. अवरसा, ता. अंकोला, सध्या रा. बेळगाव) आणि राजेश मंजुनाथ नाईक (वय 32 रा. मराठीकोप्प, ता. शिरसी) अशी आहेत.
अंबरग्रीस वाहतूकप्रकरणी हावेरी येथील अन्नपूर्णा महिलेचा सहभाग असावा, असा संशय व्यक्त करण्यात येत असून पोलीस सदर महिलेचा शोध घेत आहेत. या प्रकरणाबद्दल समजलेली माहिती अशी, अंबरग्रीसची हावेरी येथील महिलेकडून खरेदी करून विक्रीसाठी वाहतूक करण्यात येणार आहे, अशी माहिती विश्वसनीय सूत्रांकडून पोलीस खात्यांना मिळाली होती. त्यानुसार कारवार जिल्हा पोलीस प्रमुख शिवप्रसाद देवराजू आणि शिरसीचे डीएसपी रवी नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली आणि शिरसीचे सीपीआय रामचंद्र नाईक यांच्या नेतृत्त्वाखाली मराठीकोप्प येथील दहाव्या क्रॉसवर धाड टाकून संतोष कामत आणि मंजुनाथ नाईक यांना ताब्यात घेऊन त्यांच्याकडे असलेले सुमारे 5 कोटी रुपये किमतीचे साडेपाच किलो वजनाचे अंबरग्रीस व वाहतुकीसाठी वापरलेली मारुती स्वीफ्ट कार जप्त केली. या कारवाईत शिरसी मार्केट पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक भीमा शंकर, शिरसी ग्रामीण पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक इरय्या, प्रोबेशनरी उपनिरीक्षक महांतेशसह शिरसी मार्केट पोलीस ठाण्याचे आणि शिरसी ग्रामीण पोलीस ठाण्याचे कर्मचारी सहभागी झाले होते.
अशा प्रकरणाची जिल्हय़ात पहिल्यांदाच नोंद
अंबरग्रीस वाहतूक प्रकरणाची नेंद महाराष्ट्र आणि गुजरात या राज्यात होत असते. काही महिन्यापूर्वी सिंधुदुर्ग जिल्हय़ातील देवबाग समुद्र किनाऱयावरही स्थानिक मच्छीमारी बांधवांना अंबरग्रीस आढळून आले होते. त्याचबरोबरच कर्नाटकातील म्हैसूर, बेंगळूर, मंगळूर आदी शहरातही यापूर्वी अंबरग्रीस जप्त केल्याच्या घटना घडल्या आहेत. तथापि, कारवार जिल्हय़ात पहिल्यांदाच अशा प्रकारच्या प्रकरणाची नोंद झाली आहे. त्यामुळे कायद्याच्या कुठल्या कलमांतर्गत संशयित आरोपीवर गुन्हा दाखल करायचा, असा प्रश्न पोलीस खात्यासमोर पडला आहे, असे सांगण्यात आले.
आखाती आणि युरोपीयन देशात मोठी मागणी
आमच्या देशात कायद्याने अंबरग्रीसच्या विक्री आणि वाहतुकीवर बंदी आहे. हे दुर्मीळ अंबरग्रीस संशोधनासाठी महागडय़ा औषध आणि सुगंधी पदार्थ निर्मितीसाठी वापरले जाते. लाखाच्या भावाने विकल्या जाणाऱया अंबरग्रीसला आखाती आणि युरोपियन देशात मोठी मागणी असल्याचे सांगण्यात आले.
अंबरग्रीस कसे तयार होते
मिळालेल्या माहितीनुसार देवमासा, ऑक्टोपससह काटे असलेल्या इतर मासळीचे सेवन करतो. सेवन केलेल्या खाद्यामुळे पचनक्रियेत बिघाड होऊन देवमासा उलटी करतो. केलेल्या उलटीची समुद्रातील पाण्याशी रासायनिक प्रक्रिया होऊन उलटीचे रुपांतर अंबरग्रीसमध्ये होते. अंबरग्रीस वजनाला हलके असल्याने पाण्याबरोबर तरंगत किनाऱयावर फेकले जाते. शिरसी पोलीस अंबरग्रीस वाहतूक प्रकरणाचा अधिक तपास करीत आहेत. चौकशी अंती प्रकरणाचा अधिक उलगडा होणार आहे, असे पोलिसांनी सांगितले.