सावंतवाडी मतदारसंघातील चार रुग्णालयांना प्रदान : मंत्री एकनाथ शिंदे, आमदार दीपक केसरकर यांचा उपक्रम
वार्ताहर / सावंतवाडी:
शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील रुग्णालयांना कोरोनाच्या पार्श्वभूमीवर ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले.
राज्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे आणि आमदार दीपक केसरकर यांच्या संयुक्त विद्यमाने हे ऑक्सिजन कॉन्सन्टेटर सावंतवाडी विधानसभा मतदारसंघांमधील चार रुग्णालयांना प्रदान करण्यात आले. दरम्यान, सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर वैद्यकीय अधीक्षक डॉ. उत्तम पाटील यांच्याकडे सुपुर्द करण्यात आले. यावेळी डॉ. मुरलीधर उपस्थित होते. सावंतवाडी तालुकाप्रमुख रुपेश राऊळ यांच्या हस्ते दोन ऑक्सिजन कॉन्सन्टेटर देण्यात आले. यावेळी शिवसेना सावंतवाडी शहर प्रमुख आणि नगरसेवक खेमराज उर्फ बाबू कुडतरकर, उपजिल्हाप्रमुख अशोक दळवी, उपजिल्हा संघटक शब्बीर मणियार, युवासेनेचे योगेश नाईक, आबा सावंत, विशाल बांदेकर, पप्पू नाईक, गजानन नाटेकर, गजा सावंत आदी शिवसेना पदाधिकारी आणि शिवसैनिक उपस्थित होते.
विधानसभा मतदारसंघातील दोडामार्ग ग्रामीण रुग्णालयाला एक, शिरोडा उपजिल्हा रुग्णालयाला एक, वेंगुर्ले उपजिल्हा रुग्णालयाला एक व सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला दोन असे एकूण पाच ऑक्सिजन कॉन्सन्टेटर प्रदान करण्यात आले. यापूर्वी सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला चार ऑक्सिजन कॉन्सन्टेटर देण्यात आले असल्याने शिवसेनेच्या माध्यमातून आत्तापर्यंत सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयाला सहा ऑक्सिजन कॉन्सन्टेटर देण्यात आल्याची माहिती तालुकाप्रमुख राऊळ यांनी दिली.
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कोकणासह पश्चिम महाराष्ट्र आणि महाराष्ट्रात पूरस्थिती असल्यामुळे आपला वाढदिवस साजरा करू नये असे आवाहन केले होते. त्यानुसार उपक्रमांद्वारे वाढदिवस साजरा करण्यात आला. फ्लेक्स आणि बॅनर्स लावण्यात आले नाहीत. मुंबई-झाराप-पत्रादेवा-गोवा चौपदरी महामार्गाच्या दुभाजकावर फुलझाडे लावण्याचा कार्यक्रम हाती घेण्यात येणार असल्याचे तालुका प्रमुख राऊळ यांनी सांगितले.









