समानिकरणात अनेकांना सोडावा लागणार पसंतीचा तालुका : कमी कालावधीमुळे प्रशासनाची होणार दमछाक
प्रतिनिधी / ओरोस:
कोरोनाच्या अनलॉक टप्प्यात आता शासनाने 15 टक्के कर्मचाऱयांची जिल्हांतर्गत बदली प्रक्रिया राबविण्याचे आदेश दिले आहेत. दरम्यान शिक्षकांच्या बदल्याही ऑफलाईन करण्यात येणार आहेत. शासनाच्या या निर्णयामुळे जिल्हय़ातील उपशिक्षक आणि पदवीधर अशा एकूण सुमारे 500 शिक्षकांना बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. दरम्यान 31 जुलैपर्यंत ही प्रक्रिया राबवायची असल्याने शिक्षण विभागाला तारेवरची कसरत करावी लागणार आहे. तर यामध्ये समानिकरण होण्याची शक्यता असल्याने अनेक शिक्षकांना आपला आवडता तालुका सोडणे भाग पडणार आहे.
शिक्षकांच्या समुपदेशन पद्धतीने होणाऱया बदल्या तत्कालिन ग्रामविकास मंत्री पंकजा मुडे यांनी ऑनलाईन पद्धतीने करण्याचे धोरण आखून दिले आहे. मागील दोन वर्षांपासून या नव्या धोरणानुसार मे अखेरपर्यंत या बदल्या पार पाडल्या जातात. यावर्षी मात्र कोरोना लॉकडाऊन कालावधीमुळे त्या खोळंबल्या होत्या. आता 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार 31 जुलैपर्यंत ऑफलाईन पद्धतीने ही प्रक्रिया पार पाडण्याचे निर्देश शासनाकडून देण्यात आले आहेत.
सर्वात जास्त बदली पात्र कर्मचारी संख्या असलेल्या शिक्षक संवर्गाच्या बदलीची प्रक्रिया शिक्षण विभागाने हाती घेतली आहे. मात्र 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार एवढय़ा कमी कालावधीत सर्व निकषांची पूर्तता करून बदली प्रक्रिया राबविताना आणि शिक्षकांचे समाधान करताना शिक्षण विभागाची चांगलीच दमछाक होणार आहे.
सद्यस्थितीत जिल्हय़ात उपशिक्षकांची 2695, तर पदवीधर शिक्षकांची 697 पदे कार्यरत आहेत. त्यामुळे 404 उपशिक्षकांच्या, तर 104 पदवीधर शिक्षकांच्या बदल्या होण्याची शक्यता आहे. या बदल्या करताना 27 फेब्रुवारी 2017 च्या शासन निर्णयानुसार संवर्गनिहाय प्राधान्यक्रम ठरवून बदली प्रक्रिया राबविणे अपेक्षित आहे. ऑनलाइन पद्धतीने ही प्रक्रिया सुलभ ठरत असली, तरी उपलब्ध कालावधीत ती आफलाईन पद्धतीने राबविताना तारेवरची कसरत करावी लागणार आहे.
आजारी, पक्षाघात, अपंग, इत्यादी शिक्षकांचा संवर्ग 1 मध्ये समावेश होतो. त्यानंतर पतिपत्नी एकत्रिकरण (30 किमीच्या बाहेर असणाऱयांसाठी), अवघड क्षेत्रात तीन वर्षे पूर्ण करणारे, सर्वसाधारण क्षेत्रात 10 वर्षे सेवा झालेले विनंती अर्ज या व अशा टप्प्यातील निकषानुसार ही बदली प्रक्रिया होणार आहे. त्यातही याच शासन निर्णयानुसारचा समानिकरण हा मुद्दाही विचारात घेतला जाणार आहे. त्यामुळे रिक्त पदांची संख्या कमी असलेल्या तालुक्यातील शिक्षकांना जास्त प्रमाणात पदे रिक्त असलेल्या तालुक्यात जाणे भाग पडणार आहे.
सद्यस्थितीत जिल्हय़ातील रिक्त जागांचे प्रमाण हे 12.37 टक्के आहे. यामध्ये मालवण तालुक्यात सर्वाधिक जागा रिक्त असून हे प्रमाण 17.75 टक्के आहे. त्यानंतर वैभववाडी 17.65, देवगड 17.42, वेंगुर्ले 16.27, दोडामार्ग 15.87, कुडाळ 9.82, कणकवली 6.54, तर सावंतवाडी तालुक्यात 5.51 टक्के जागा रिक्त आहेत. त्यामुळे समानिकरण झाल्यास अनेक शिक्षकांना पसंतीचा तालुका सोडून अन्य तालुक्यात जावे लागणार आहे.
दरम्यान शिक्षकांची संख्या आणि बदली निकष विचारात घेता ही बदली प्रक्रिया राबविण्यासाठी देण्यात आलेला कालावधी फारच कमी मानला जात आहे. बदली यादी तयार करणे, ती प्रसिद्ध करणे, त्यावर हरकती घेणे, अंतिम यादी तयार करणे, अपिल करण्यासाठी वेळ देणे आणि त्यानंतर प्रत्यक्ष कार्यवाही करणे आदी सर्व टप्पे उर्वरित केवळ दहा दिवसांत पूर्ण करण्याचे आव्हान शिक्षण विभागाला पेलावे लागणार आहे. यापूर्वी बदली होऊन अद्याप तीन वर्षे न झालेल्या शिक्षकांना मात्र वगळण्यात येणार आहे. त्यांची विनंती असेल, तरच विचार केला जाणार असल्याचे शिक्षण विभागाकडून स्पष्ट करण्यात आले.
दरम्यान जिल्हा परिषदेच्या विविध विभागात सेवा बजावणाऱया लिपिक वर्गीय कर्मचाऱयांनाही बदली प्रक्रियेला सामोरे जावे लागणार आहे. 15 टक्केप्रमाणे नेमक्या किती बदल्या होणार, यावर काम सुरू असून या बदल्या मात्र समुपदेशन पद्धतीने होणार असल्याचे सामान्य प्रशासन विभागाकडून सांगण्यात आले.









