अध्याय सातवा
अवधूत आत्मानंदाने परिपूर्ण होते. यदुराजाने त्याचे कारण त्यांना विचारले. त्यावर अवधूत म्हणाले, ‘राजा, गुरुवाचून कधीही आत्मप्राप्ती होत नाही हे लक्षात घेऊन मी प्राणिमात्रांच्यातले सद्गुण हेरले. ज्याच्यात जो सद्गुण होता तो आत्मसात करण्यासाठी मी त्याला गुरु केला. एवढेच नाही तर ज्याच्यात जो दुर्गुण होता तो आपल्यात येऊ नये म्हणून त्यालाही मी गुरु केला. त्यामुळे हे जग सर्वत्र गुरुंनीच भरलेले आहे असे मला वाटू लागले. हे साधन ज्याच्यापाशी असते त्याला परमार्थ प्राप्त होतो.’ माझ्या प्रमुख गुरुंची माहिती मी तुला सांगतो. असे म्हणून अवधूत यदुराजाला त्यांनी केलेल्या गुरुंची माहिती देत आहेत. पृथ्वी, वायू, आकाश आणि जल या चार गुरुंची माहिती अवधुतानी राजाला दिली. पृथ्वीपासून क्षमाशील वृत्ती व सहनशीलता, वायूपासून समत्व आणि अलिप्तता, आकाशापासून सर्वव्यापकता, जलापासून शीतलता हे गुण घेतल्याचे त्यांनी सांगितले आता पाचवे गुरु अग्नी यांच्याबद्दल माहिती देताना ते म्हणाले, ‘अग्नी त्याच्या स्वाभाविक तेजाने देदीप्यमान असतो. त्याला प्रत्यक्ष हातात धरता येत नाही पण तो प्रत्येक प्राण्याच्या पोटात साठवलेला असून स्वभावतःच प्रदीप्त होऊन सर्व भक्षण करत असतो. योग्यानेही भगवतभक्तीने अग्निप्रमाणे देदीप्यमान असायला हवे मग तो देवादिकांपेक्षा वरचढ ठरतो. ज्याप्रमाणे अग्नी हातात धरणे शक्मय नसते त्याप्रमाणे योगी व्यक्तीने स्वतःची दाहकता अशी करावी की, मायेने त्याच्या जवळपाससुद्धा फिरकू नये अशी व्यवस्था करावी. अग्नी ज्याच्याकडे मोहरा वळवतो त्याला जाळून आपल्यासारखा करून सोडतो. चंदनाचा सुवास धुराच्या दुर्गंधात रूपांतरित होतो. कडूनिंब, गोड ऊस हे सर्व जाळून अग्नी त्यांना आकाराविकाराने त्याच्यासारखे करून टाकतो.
अग्निमुखाने यज्ञ होतो त्या कर्माने स्वर्गप्राप्ती घडते. त्याप्रमाणे योग्याच्या मुखात जे जे पडते त्याने आत्मपदाची सहज प्राप्ती होते. वरून राखेने झाकलेला होमकुंडातील अग्नी आत तेजस्वी असतो. उपासकांच्या मनातील भाव जाणून आणि त्याची सर्व पातके जाळून हविग्रहण करतो. योग्यानेही असेच करायला हवे. समाजापासून गुप्त राहून लोकांनी अर्पण केलेल्या वस्तू स्वीकारून मुमुक्षुना मोक्ष प्राप्त करून द्यावा. अग्नी स्वभावतःच निराकार आहे. मायेच्या प्रभावाखाली असलेल्या, मनुष्याच्या संकल्प विकल्पाप्रमाणे भगवंत आकार धारण करतात ज्याप्रमाणे गंगाजल नाना तरंग, भोवरे, लाटा, कल्लोळ अशी रूपे धारण करते तसेच जगाचेही निरनिराळे आकार भासतात. योग्यानेही तसेच असावे. अनेक आकाराच्या व्यक्ती, त्यांची नाना रूपे, नाना कृती पहात असताना त्याने समवृत्तीने त्यांच्यात प्रवेश केलेल्या व त्यांना त्याच्या इच्छेनुसार नाचवणाऱया ईश्वराला पहावे. त्याचे आत्मरूप पहावे. सर्वत्र ईश्वराच्या उपस्थितीची अनुभूती घ्यावी. तोच ईश्वर आपल्यातही आहे म्हणजे त्याला कोणत्याही प्रकारची भेदाची भ्रांती होत नाही. हे सगळे एकसंधच आहे असे अवधूतानी हात उंच करून ठामपणे सांगितले. अवधुतानी चंद्राला पुढील गुरु केले. त्याबद्दल पुढील भागात पाहू ….







