एक रूपयात मिळणार एक लीटर पाणी, गावात दोन ठिकाणी बसणार मशिन
वार्ताहर / पाचल
तालुक्यातील पाचल ग्रामपंचायतीच्यावतीने लोकांना कमी पैशामध्ये शुद्ध पाणी उपलब्ध व्हावे म्हणून पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरू करण्यात येणार आहे. या एटीएममधून लोकांना एक रूपयात एक लीटर शुद्ध पाणी उपलब्ध होणार आहे. अशाप्रकारे लोकांसाठी पिण्याच्या पाण्याचे एटीएम सुरू करणारी रत्नागिरी जिल्हय़ातील पहिली ग्रामपंचायत ठरण्याचा मान पाचल ग्रामपंचायतीला मिळणार आहे.
तालुक्याच्या पूर्व भागातील सुमारे चाळीस गावांचे पाचल गाव हे मध्यवर्ती ठिकाण आहे. दिवसागणिक प्रगतीच्या दिशेने झेपावत असलेल्या पाचल ग्रामपंचायतीने शासनाच्या जिल्हास्तरीय स्मार्ट ग्राम पुरस्कारासह अन्य विविध पुरस्कारांवर यशाची मोहोर उमटविली आहे.
पाचल येथे परिसरातील मोठी बाजारपेठ असून बॅकींग, वैद्यकीय आणि शैक्षणिक आदी विविध सुविधाही या ठिकाणी आहे. त्यामुळे लोकांची नियमित वर्दळ असते. बाजारपेठेसह विविध कामानिमित्ताने येणाऱया लोकांसह शाळकरी मुले मिळून सुमारे दहा हजार लोक दिवसभरामध्ये या ठिकाणी येतात. त्यामधील अनेकांना पिण्याच्या पाण्याची बाटली खरेदी करण्यासाठी ‘खिसा’ रिकामा करावा लागतो. त्यामध्ये एक लिटर पाण्यासाठी सुमारे 10 ते 20 रूपयांचा भुर्दंड पडतो. ही बाब लक्षात घेवून पाचल ग्रामपंचायतीने सरपंच सौ.मासये यांच्या मार्गदर्शनाखाली शुद्ध पिण्याच्या पाण्याची दोन एटीएम सुरू करण्याचा निर्णय घेतल्याची माहिती उपसरपंच श्री.नारकर यांनी दिली.
पाचल ग्रामपंचायतीच्या आवारामध्ये पाण्याचे एटीएम सुरू करण्यासाठी लागणाऱया निधीची सरपंच अपेक्षा मासये आणि सहकाऱयांच्या मार्गदर्शनाखाली तयार करण्यात आलेल्या पंधराव्या वित्त आयोगाच्या आराखडय़ामध्ये सुमारे 3 लाख रूपयांची तरतूद करण्यात आली आहे. तर दुस्ऱया एटीएमसाठी जिल्हा परिषदेचा जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा पटकाविलेल्या स्मार्ट ग्राम पुरस्काराच्या रक्कमेतून निधी खर्च करण्यात येणार आहे. ग्रामपंचायत कार्यालय इमारत आवार आणि पाचल हायस्कूलच्या आवारामध्ये ही दोन्ही एटीएम सुरू करण्यात येणार असून येत्या महिना-दिड महिन्यामध्ये सरपंच सौ.मासये यांच्या नेतृत्वाखाली पिण्याच्या पाण्याचे एटीएम कार्यान्वित होण्याचा विश्वास पाचलचे उपसरपंच किशोर नारकर यांनी व्यक्त केला.









