वृत्तसंस्था/लाहोर
कोरोना महामारी समस्येमुळे पाकमधील खेळविल्या जाणाऱया पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेवर विपरित परिणाम झाला आहे. पाकमध्ये पुन्हा कोरोनाचा प्रसार मोठय़ा प्रमाणात सुरू झाल्याने सहाव्या पाक सुपर लीग क्रिकेट स्पर्धेतील लांबणीवर टाकलेले सामने जूनमध्ये खेळविण्याचा निर्णय पीसीबीने घेतला आहे. आता हे सामने 1 ते 20 जून दरम्यान कराचीत खेळविले जातील.
या स्पर्धेत सहभागी होणाऱया क्रिकेटपटूंना 22 मे पासून 7 दिवसांच्या क्वारंटाईन कालावधीला प्रारंभ केला जाईल. मार्च महिन्यात अनेक क्रिकेटपटूंना कोरोनाची बाधा झाल्याने सदर स्पर्धा लांबणीवर टाकण्याचा निर्णय घेण्यात आला होता. या स्पर्धेतील 14 सामने 20 फेब्रुवारी ते 3 मार्च दरम्यान खेळविले गेले. आता उर्वरित सामने 1 जूनपासून पुन्हा पुढे खेळविले जातील, असे पीसीबीच्या प्रवक्त्याने सांगितले.









